कंदर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण

कंदर(संदीप कांबळे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची वार्ता समजताच कंदर गावावर शोककळा पसरली. त्यांच्या स्मरणार्थ कंदर गाव शंभर टक्के बंद ठेवून ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. आज आठवडा बाजार असूनही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.
सायंकाळी साडेसहा वाजता विठ्ठल चौकात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच मौला साहेब मुलाणी, उपसरपंच उदयसिंह शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली.

