करमाळ्यात नवे सत्तासमीकरण - जयवंतराव जगताप यांचा भाजप–राष्ट्रवादी युतीला पाठिंबा -

करमाळ्यात नवे सत्तासमीकरण – जयवंतराव जगताप यांचा भाजप–राष्ट्रवादी युतीला पाठिंबा

0
आमदार राजेंद्र राऊत, जयवंतराव जगताप व रश्मी बागल

करमाळा: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या घडामोडींचे केंद्र बार्शी ठरले असून माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पुढाकाराने माजी आमदार जयवंतराव जगताप व रश्मी बागल यांच्यात बार्शी येथे बैठक पार पडली. या बैठकीत जगताप गटाने भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

येत्या दोन दिवसांत करमाळा येथे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत जगताप, बागल व संजयमामा शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद होऊन या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे समजते. या निर्णयामुळे करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर मोठा ‘भूकंप’ अनुभवास आला असून संपूर्ण राजकीय समीकरण बदलल्याचे चित्र आहे. याचा थेट फायदा जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी युतीला होणार असल्याचे मानले जात आहे.


नुकतेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर करून मतदारांना योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पुढाकार घेत त्यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने पालकमंत्री गोरे व माजी आमदार राऊत यांच्या प्रयत्नांतून जगताप, शिंदे व बागल गटांत समेट घडून आला. त्यानंतर जगताप यांनी युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने भाजप–राष्ट्रवादी युतीचे पारडे जड झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!