उत्तरेश्वर अन्नछत्रासाठी दानशूरांचे योगदान

केम(संजय जाधव): केम येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या श्री उत्तरेश्वर अन्नछत्र उपक्रमास विविध दानशूर कुटुंबांनी स्मृतीप्रित्यर्थ देणग्या देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

करमाळा येथील रहिवासी सौ. मंगल सुधीर पंडित व श्री. सुधीर विनायक पंडित या दांपत्याने आपल्या आई-वडील कै. पार्वती व कै. दादासाहेब महादेव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ अन्नछत्रातील अक्षय कायमस्वरूपी ठेव योजना अंतर्गत प्रत्येकी ५१ हजार रुपये प्रमाणे एकूण १ लाख २ हजार रुपयांची देणगी देवस्थान ट्रस्टकडे धनादेशाद्वारे सुपूर्त केली. या योजनेनुसार दरवर्षी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक सोमवारी अन्नदान करण्यात येणार आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे व विश्वस्त मंडळाच्या वतीने पंडित दांपत्याचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


तसेच केम येथील शिक्षक कै. रामचंद्र गेनबा तळेकर (गुरूजी) यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र डॉ. अंकुश तळेकर तसेच बंधू श्री. नंदकुमार व श्री. अरुण तळेकर यांनी परिवारातर्फे ५१ हजार रुपयांची देणगी अन्नछत्र मंडळास दिली.

याचप्रमाणे डॉ. अंकुश तळेकर यांच्या दिवंगत आजी-आजोबा कै. गीताई व कै. गेनबा तळेकर यांच्या स्मरणार्थ समस्त गीता-गेणू परिवार यांच्या वतीने ५० हजार रुपयांची देणगी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे व सचिव मनोजकुमार सोलापूरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी विश्वस्त विजय तळेकर, अवधूत येवले तसेच तळेकर परिवारातील सदस्य व नातेवाईक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे यांनी ग्रामस्थांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदान व देणगीद्वारे या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.


