भोसे येथे वीज कनेक्शनच्या वादातून हनुमंत वारे यांच्यावर हल्ला

0

करमाळा,ता.१:भोसे येथील कार्यकर्ते हनुमंत जयवंत वारे (वय ५२) यांच्यावर वीज कनेक्शनच्या वादातून हल्ला झाल्याची घटना २६ फेब्रुवारी ला  सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हनुमंत वारे हे भोसे येथील बागल गटाचे कार्यकर्ते व भोसेचे मा. उपसरपंच प्रतिनिधी आहेत. त्यांच्या वारे वस्तीवरील घराला लागून असलेल्या आजिनाथ सुरवसे यांच्या शेतातील डी.पी.वरून त्यांच्या घराला वीजपुरवठा जोडलेला आहे. संबंधित लाईटचे पोल हे शेजारी विनोद रोडगे यांच्या शेतातून गेले आहेत.

हनुमंत वारे

दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी वारे यांच्या घरातील वीजपुरवठा खंडित झाला. चौकशी केली असता, विनोद रोडगे यांनी त्यांच्या शेताच्या बांधावरील पोलवरील जंप काढल्याचे समजले. त्यामुळे वारे यांच्या घरात वीजपुरवठा बंद झाला होता.

दरम्यान, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता वारे हे वायरमन चव्हाण यांना घेऊन संबंधित पोलवरील जंप पुन्हा जोडण्यासाठी गेले असता तेथे विनोद रोडगे, आजिनाथ सुरवसे, वंदना सुरवसे व सुनिता रोडगे उपस्थित होते. त्यावेळी “तू माझ्या रानात का आला, कनेक्शन जोडायचे नाही,” असे म्हणत संबंधितांनी वायरमनला खाली उतरवून वारे यांना शिवीगाळ व दमदाटी केली आणि वारे यांना विनोद रोडगे यांनी जवळील लोखंडी खोऱ्याने त्यांच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते घटनास्थळी बेशुद्ध पडले.

यानंतर प्रफुल्ल वारे व रविंद्र आडसुळ यांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी त्यांना सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर येथे हलविण्यात आले होते.उपचारानंतर त्यांनी  फिर्याद दिली.
या प्रकरणी पोलीसांनी विनोद रोडगे, आजिनाथ सुरवसे, वंदना सुरवसे व सुनिता रोडगे (सर्व रा. भोसे, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!