विहिरीतील गाळाचा प्रलंबित १५ हजारांचा हप्ता तातडीने जमा करा; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सीना नदीला आलेल्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील १७ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी प्रति हेक्टरी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यास मान्यता दिली असतानाही अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप शासनाकडे पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. पल्लवी सूर्यकांत पाटील यांनी करमाळा तहसीलदारांकडे निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष अमरजित साळुंके, आदिनाथचे संचालक डॉ. अमोल घाडगे, उपाध्यक्ष निलेश झोळ-पाटील, सरचिटणीस सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
१७ गावांतील शेतजमिनींचे मोठे नुकसान
सीना नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या १७ गावांमध्ये खडकी, अळजापूर, बिटरगाव (श्री), तरडगाव, निलज, बाळेवाडी, पोटेगाव, बोरगाव, करंजे, भालेवाडी, दिलमेश्वर, मिरगव्हाण, हिवरे, निमगाव (ह), कोळगाव आणि आवाटी या गावांचा समावेश आहे. या गावांमधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या असून, सुपीक माती वाहून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी ३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली आहे. मात्र, प्रस्ताव शासनाकडे न पोहोचल्याने अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून सर्व प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली.
विहिरीतील गाळ काढण्याचा १५ हजारांचा दुसरा हप्ता द्यावा
पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. विहिरीतील गाळ काढण्यासाठी शासनाने ३० हजार रुपयांचे अनुदान मंजूर केले असून, त्यापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे. मात्र, उर्वरित १५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही.
विहिरीतील गाळ काढण्याचे काम पूर्ण करूनही दुसरा हप्ता प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रलंबित असलेला १५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी राजुरीचे माजी सरपंच आबासाहेब टापरे, ॲड. सविता शिंदे, ॲड. प्रशांत बागल, वैजीनाथ तरंगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





