“लखाबाय .. पोतराज आलाय भेटीला” गीत गाऊन सोहिलने जिंकली प्रेक्षकांची मने
करमाळा : सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात सोहील मुलाणी यांनी “लखाबाय .. पोतराज आलाय भेटीला” हे गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली.( या गीताची व्हिडीओ बातमीच्या खाली दिली आहे.)
सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या ५ व्या पर्वामध्ये टॉप १६ स्पर्धक निवडले असून सध्या ग्रँड प्रीमिअर हा भाग चालू आहे. या भागात कुणीही वगळले जाणार नसून सर्वांना आपापले गाणे सादर करण्याची संधी दिली जात आहे.
या कार्यक्रमात आलेश्वर( ता.परांडा) येथील सोहील मुलाणी हे सहभागी असून त्यांनी चंदन कांबळे यांनी तयार केलेले “लखाबाय .. पोतराज आलाय भेटीला” हे गीत गाऊन प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमामध्ये संगीतकार-गायक अवधूत गुप्ते व शास्त्रीय संगीत गायक महेश काळे हे परीक्षक म्हणून काम करत आहेत.
मागच्या भागात सोहील यांनी “आंबे ग माय” हे गीत सादर केले होते तर सुरवातीला झालेल्या ऑडिशन कार्यक्रमामध्ये सोहील यांनी “मधूदेवा माझी जिंदगी तुझ्या नावावर” हे गीत गाऊन परीक्षकांवर प्रभाव टाकला होता.
सोहील मुलाणी यांचा लहानपणापासून करमाळा शहराशी फार जवळचा संबंध आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी हायस्कूल, करमाळा येथे झाले. याच वेळी ते करमाळ्यातील सूरताल संगीत विद्यालयात बाळासाहेब नरारे यांच्याकडे संगीत शिक्षण घेत होते. त्यानंतर बार्शी व बीड येथे पुढचे संगीत शिक्षण घेतले आहे. सोहील यांचे शिक्षण एम ए (म्युझिक) झाले असून ते संगीत विशारद आहेत.त्यांच्या वडिलांचा बेंजोचा व्यवसाय असून सोहील यांनी त्यांच्या बरोबर अनेक कार्यक्रम केले आहेत.सोहील यांनी कोरोना आधी २ वर्षे करमाळा येथेच सरगम संगीत क्लासेस सुरू केले होते. कोरोनामुळे त्यांनी संगीत विद्यालय बंद केले होते.
त्यानंतर गायक-संगीतकार चंदन कांबळे यांच्याशी सोहील यांची अनेक मैफिलीत भेट झाली होती. सोहील यांच्यातील गायनाची कला पाहून चंदन कांबळे प्रभावित झाले व त्यांनी सोहील यांना पुण्यात बोलावून टिव्ही चॅनेलवरील स्पर्धा मध्ये भाग घेण्यास मार्गदर्शन सुरू केले.
सोहील यांच्या या दमदार वाटचाली मुळे करमाळा तालुक्यातील त्यांच्या मित्रपरिवाराकडून व हितचिंतकांकडून त्यांचे व परिवाराचे अभिनंदन केले जात असून पुढील राउंड साठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.