ग्रामसुधार समितीचा “करमाळा भूषण पुरस्कार” ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. राजेंद्र दास यांना जाहीर – १३ ऑगस्टला पुरस्कार वितरण
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ग्रामसुधार समितीच्यावतीने दिला जाणारा सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजेंद्र दास यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा. यशकल्याणी सेवाभवन परिसर येथे होणार आहे.
या पुरस्काराचे वितरण सिनेअभिनेते व दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे यांचे हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी तसेच साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे; असे आवाहन ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबूराव हिरडे, उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे व सचिव डी. जी. पाखरे यांनी केले.
प्रा. डॉ. राजेंद्र दास यांचा करमाळ्याशी लहानपणापासून संपर्क आहे. त्यांचे वडील करमाळा तालुक्यात शिक्षक होते. त्यांचे स्वत:चे शिक्षणही करमाळ्यात झाले आहे. ते लेखक, कवी, व्याख्याते म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचा ‘इमान’, ‘कोसळेपर्यंत’ व ‘शब्द भेटण्याच्या वयात’ हे कवितासंग्रह प्रकाशित असून ‘यांत्रिक’ हा चरित्रग्रंथ प्रकाशित आहेत. या पुस्तकांना सात पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.