माणसाचे सानिध्य एकमेकांच्या अस्तित्वाने आहे – नागराज मंजुळे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : “देश नेमकं कोण आहे ? देशाने माझा विचार करायचा म्हणजे नेमकं कोणी करायचा ? आणि मी देशाचा विचार करायचा म्हणजे कोणाचा करायचा ? देश म्हणजे माणसच आहेत, देशाच्या सीमा म्हणजे देश नाही, माणसं म्हणजेच देश आहे..” माणसाशिवाय आपले काहीच खरे नाही, माणसाचे सानिध्य एकमेकांच्या अस्तित्वाने आहे, त्यामुळे एकमेकांवर प्रेम करून, त्यांची काळजी करून जगले पाहिजे असे मत सिनेअभिनेते व दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
ग्रामसुधार समितीच्यावतीने दिला जाणारा सन्मानाचा “करमाळा भूषण” पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. राजेंद्र दास यांना सिनेअभिनेते व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे हस्ते आज (ता.१३) सायंकाळी यशकल्याणी सेवाभवन येथे देण्यात आला. याप्रसंगी श्री.मंजुळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांनी केले.
याप्रसंगी पुढे बोलताना दिग्दर्शक श्री.मंजुळे म्हणाले की, प्रसिद्ध फिल्मी लोक आहेत, त्यांच ग्लॅमर असते, परंतु कवी, साहित्यिक, विचार करणारे माणसांचे तसेच समाजासाठी काही करणाऱ्या माणसांचा विचार करायला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे मी करमाळेकरांचा आभार मानतो, माझ्यासाठी आजचा आनंदाचा आणि आश्चर्याचा दिवस आहे, आज माझ्या हस्ते दास सरांचा सत्कार होतोय, हे माझ्यासाठी खुपच महत्वाचे आहे, दास सरांच्या या महत्त्वाच्या आठवणीत मी सामील झालोय, याचा मला आनंद आहे, माझ्या सारख्या माणसाच्या हातून पुरस्कार घ्यायचा तुम्ही आग्रह धरला याचा मला आनंद आहे, मी त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो, आज जरी दास सरांना पुरस्कार दिला असला तरी हा पुरस्कार मलाच मिळाला हे मी समजतोय व हा पुरस्कार माझाच आहे हे मीच घोषीत करतो. असेही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी करमाळा भूषण पुरस्कार या सत्काराला उत्तर देताना प्रा.दास यांनी करमाळा शहरातील आठवणीना उजाळा दिला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी प्रा.दास सर व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याविषयी विचार व्यक्त करत जोरदार भाषण केले. यावेळी व्यासपीठावर करमाळा पोलिसस्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते व दिग्दर्शक, कलाकार नागराज मंजुळे यांचा सत्कार ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमुर्ति प्रा.दास यांचा परिचय साहित्यिक भीष्माचार्य चांदणे यांनी दिला तसेच मानचिन्हाचे वाचन ग्रामसुधार समितीचे संचालक प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व इतर पाहुण्यांचा सत्कार समितीचे उपाध्यक्ष नाथाजीराव शिंदे, संचालक गजेंद्र पोळ, व्हि.आर.गायकवाड, नीलकंठ ताकमोगे, सचिव डी.जी. पाखरे यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनीता दोशी यांनी केले तर आभार एन.डी.सुरवसे यांनी मानले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परिश्रम यशकल्याणी संस्था व सर्व टिम तसेच ॲड.सचिन हिरडे, आकाश मंगवडे, रोहन माने, कृष्णा खंडागळे आदी जणांनी घेतले.
प्रा.दास यांना आजपर्यंत मिळालेले विविध पुरस्कार…
शिक्षक म्हणून कुर्डुवाडी येथील आदर्श व्यक्ती गौरव समितीचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ठाणे येथील रोटरी कल्ब तर्फे ‘एक्सलन्स ॲवार्ड – २००६’, सोलापूर मराठा सेवा संघाचा ‘समाजभुषण पुरस्कार २००६’ मिळाले तर आपल्या साहित्याला ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाड:मय निर्मिती पुरस्कार’, ‘कविवर्य रा. ना पवार पुरस्कार’, शिवगिरजा प्रतिष्ठानचा ‘स. मा. कदम गुरुजी पुरस्कार’, ‘सा. वारणेचा वाघ साहित्य पुरस्कार’, ‘कै. बाबूराव डिसले जीवनगौरव पुरस्कार’, ‘कै. शिरीष जीवनगौरव पुरस्कार’, निमगाव येथील ‘देशभक्त बळवंतराव मगर साहित्य पुरस्कार’, पिंपरी-चिंचवड येथील ‘चतुरंग साहित्य पुरस्कार’ तसेच ग्रामसुधार समितीचा करमाळ्याचा मानाचा “करमाळा भूषण” पुरस्कार…