करमाळ्याजवळील अपघातात चार जनावरांचा मृत्यू – पळून जाणाऱ्या ट्रकचालकास पकडले…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहराजवळील दिगंबररावजी बागल पेट्रोल पंपा शेजारी अहमदनगर-टेंभुर्णी महामार्गावर आज (ता.११) सकाळी सहाच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या एका मालट्रकने चार जनावरांना धडक दिली असून या अपघातात चार जनावरे जागीच ठार झाल्याचे समजले आहे. या अपघातानंतर हा ट्रक चालक हा पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला कुंभेज फाटा (ता.करमाळा) येथे पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली येथील एक शेतकरी म्हशी चारण्यासाठी परिसरात गेले असताना, करमाळा शहराजवळील बागल पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला काही म्हशी चरत असताना करमाळ्याच्या दिशेने जाणारा एक ट्रक TN 52 H 0733 हा भरधाव वेगाने आला व त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एक रेडा, एक म्हैस व दोन रेड्या यांना जोराची धडक दिली यात चारही जनावरे जागीच ठार झाल्याचे समजले आहे.
यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. एवढा मोठा अपघात घडल्यानंतर सदरचा ट्रक चालक हा त्या ठिकाणी न थांबता तसाच पुढे निघून गेला. यावेळी सदरच्या घटनेबाबत माहिती मिळताच देवळाली व परिसरातील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. त्याचा पाठलाग करून कुंभेज फाटा येथे पकडले. यानंतर ट्रकचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.