सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान भरपाई द्यावी – अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात गेल्या एक महीन्यापासून होत असलेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झाले आहे, काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे व काही ठिकाणी फळबागा उध्वस्त झाल्या आहेत तर काही ठिकाणी शेतीला पाणी लागून शेतातील हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून सरसकट आर्थिक नुकसान भरपाई म्हणून द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
जर हे आंदोलन झाले तर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, स्वाभिमानी करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, ता.युवाध्यक्ष अमोल घुमरे, ता.पक्ष्याध्यक्ष बापू फरतडे, ता युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर, शाखाध्यक्ष अशोक लवंगारे, ता उपाध्यक्ष तानाजी शिंदे, व मारूती निळ, शेतकरी कांतीलाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.