भविष्याचा वेध घेत वाटचाल करा – गणेश करे-पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आत्मसन्मानाला धक्का लागला तर त्याची प्रतिक्रिया म्हणून माणसाने केलेली वाटचाल त्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवू शकते. गाव खेड्यातील उपेक्षित वस्तीत राहून स्वत्व जपणारी माणसं जर मनातून हारली नाहीत तर ती रणातही जिंकून वर्तमानाची सोनेरी पाने लिहू शकतात हा इतिहास आहे. असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश-पाटील यांनी जेऊर येथे बोलताना केले.
जेऊर ता.करमाळा येथील भारत महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना “स्वतःकडे वळून पाहताना” या विषयावर प्रा.गणेश- करे पाटील बोलत होते.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे विशेष कार्यकारी अधिकारी हरिदास डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या जीवनप्रवासातील थोरामोठ्यांच्या सहवासातील अनेक घटना प्रसंगांना उजाळा देऊन करे-पाटील म्हणाले की, नवा इतिहास घडविण्याची उर्मी इथल्या मातीमध्ये आणि माणसांच्या नसानसामध्ये आहे म्हणून भविष्याचा वेध घेत वाटचाल करा. मैत्रीभाव जपा आणि मनात कधीही हरू नका. आपल्या अध्यक्षीय भाषणात हरिदास डांगे यांनी स्वतःच्या जडणघडणीतील अभावग्रस्त परिस्थिती व कष्टप्रद जीवनाचा पट श्रोत्यांसमोर उलगडून उपस्थितांना उद्योग व्यावसायामध्ये उतरण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी प्रा.गणेश – पाटील व हरिदास डांगे यांचा यथोचित सन्मान केला.कर्मयोगी व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये कर्मयोगी व्याख्यानमालेची भूमीका विशद करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.तर राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल मुंगुस्कर यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले.