चौफेर वाचनाने आलेली प्रगल्भता व्यक्तिमत्वाची उंची वाढवते – डॉ.अरुण अडसूळ
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवता येतो, गरीबी,दारिद्र्य यांच्यावर मात करून कोणत्याही वशिल्याशिवाय स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते आणि मिळालेल्या संधीचं सोनं करून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर आयुष्याला सुंदर आकार देता येतो, चौफेर वाचनाने आलेली प्रगल्भता व्यक्तिमत्वाची उंची वाढवते असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ यांनी जेऊर येथे बोलताना केले.
जेऊर ता.करमाळा येथील भारत महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कर्मयोगी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या व्याख्यानात “आयुष्याला आकार देताना ” या विषयावर डॉ.अरुण अडसूळ बोलत होते.भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या अत्यंत प्रवाही आणि प्रभावी भाषा शैलीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना डॉ.अडसूळ पुढे म्हणाले की,सबबी सांगण्याच्या सवयी सोडून द्या.अभ्यासाची भीती बाळगू नका.आत्मविश्वासाबरोबर आत्मपरीक्षणाची कास धरा.अंतर्मुख होऊन कालच्या चुका टाळून आजच्या वर्तमानस्थितीला भिडा. प्रसंगी अपयश पचवून पुढे जा. हुशारीने सगळेच वागतात पण हुशारीपेक्षा शहाणपणाने वागण्याचे महत्त्व अधिक असते.फायदा कशात आहे हे हुशार माणसाला कळते मात्र योग्य आणि अयोग्य यातला फरक शहाण्याला कळतो. एका रात्रीत यश येईल या भ्रमात राहू नका.अथक परिश्रमाला शॉर्टकट किंवा दुसरा पर्याय नसतो. यश आल्यावर सुद्धा संयम ठेवा, यश डोक्यात जाऊ देऊ नका.
यावेळी महाराष्ट्र करियर अकॅडमी कुंभेज फाटा चे प्रमुख श्री.पाटील यांच्या अग्नीवीर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.अरुण अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी व्याख्यानमालेचे प्रमुख प्रा. डॉ.संजय चौधरी यांनी प्रास्ताविक करून डॉ.अरुणअडसूळ यांचा परिचय करून दिला.प्रा.डॉ.अरविंद दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या व्याख्यानास भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दहिभाते,भूषण लुंकड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह जेऊर व परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.