गायरान जमिनींवर गोरगरीब जनतेने नाही तर पुढाऱ्यांनी अतिक्रमण केले – अशोक वाघमोडे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : गावातील शासकीय गायरान जमिनींवर गोरगरीब जनतेने अतिक्रमण केले नसून तालुक्यातील पुढारी व त्यांचे बगलबच्चे यांनीच या जमिनी हडप केलेल्या आहेत. अतिक्रमण केलेल्या या लोकांनी हे अतिक्रमण काढण्यास शासनास सहकार्य करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे असे मत निलज (ता.करमाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघमोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे मांडले.
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच गावपातळीवर असलेल्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमणधारकांची यादी गावच्या चावडीवर लावण्यात येणार आहे. त्यांना १० दिवसांची मुदत दिली आहे. अतिक्रमण काढून न घेतल्यास शासकीय यंत्रणेद्वारे कारवाई केली जाईल, त्यासाठीचा होणारा खर्च जमीन महसुलाची थकबाकी म्हणून संबंधिताकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला.
दिलेल्या पत्रकात वाघमोडे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात गायरान जमिनीवरती सर्वसामान्य लोकांनी अतिक्रमण केले नाही तर तालुक्यातील पुढारी व त्यांचे बगलबच्चे यांनीच या जमिनीवर अतिक्रमण केलेले असून त्यावर हायफाय बंगले, ऊस, शेती, फळबाग इत्यादी उभे आहे.
प्रत्येक गावात गायरान जमिनीमुळे खूप तंटे वाढले आहेत. तरी प्रत्येक गावातील गोरगरीब मोलमजूर शेतकरी यांच्या शेळ्या मेंढ्या व पाळीव प्राणी गाय व वन्य प्राण्यांना चराइचे कुरणे करण्यासाठी शासनाने त्वरित शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रम हटवण्यात यावे.