मोहल्ला क्लिनिक संकल्पना करमाळ्यात राबविणार : मनोज राऊत..
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील अनेक भागातील लोकांना मुले आजारी पडली तर करमाळ्याला यावे लागते. प्रवास खर्च ५०० रू. करून करमाळ्यात आल्यावर मात्र डॉक्टर वाफ देतात. याचा खर्च केवळ ३० रू. असतो. त्यामुळे अनेक पालक मुलांना दवाखान्यात आणण्यासाठी टाळतात. त्यामुळे आता त्या मशीन पंचायत समिती माध्यमातून गावोगावी उपलब्ध करून दिली आहे. तर दिल्लीतील मोहल्ला क्लिनिक च्या धर्तीवर करमाळा तालुक्यात आशा क्लिनिक ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली.
आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल करमाळा तालुक्यातील साडे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रावगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक दिलीप डोळस यांना यंदाचा एम.बी.कोष्टी उत्कृष्ट आरोग्य सेवक पुरस्काराचे वितरण हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांचे हस्ते करण्यात आले.
त्यावेळी अध्यक्षस्थानावरून गटविकास अधिकारी राऊत बोलत होते. करमाळा येथील आरोग्य सेवक महादेव कोष्टी यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त यशकल्याणी सेवाभवन मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रध्दा बोंगडे, हिवताप पर्यवेक्षक परमेश्वर वाडेकर, यशकल्याणी संस्थेचे गणेश करे-पाटील, कुरूहिन शेट्टी कोष्टी समाजाचे तालुका अध्यक्ष गजेंद्र गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश कोष्टी यांनी केले तर सुत्रसंचालन शिल्पा कोष्टी यांनी केले. उपस्थितांचे आभार संपत जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील गुंजेगावकर, अनिल गुंजेगावकर, मयंक कोष्टी यांनी परिश्रम घेतले.