करमाळा अर्बन बॅंक देवी गटाकडेच – निवडणूक झाली बिनविरोध..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील दि करमाळा अर्बन को. ऑप.बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असून, १५ सदस्य बिनविरोध निवडले आहेत; अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरी यांनी दिली आहे. करमाळा अर्बन बॅंकेवर पुन्हा देवी गटाची सत्ता आली आहे.
करमाळा अर्बन बँकेची १५ जागेसाठी निवडणूक लागली होती. या १५ जागेसाठी २२ अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये छाननी प्रक्रियेत १४ अर्ज शिल्लक राहिले होते. आज (ता. ३०) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सर्वसाधारण मतदार संघात १०, महिला प्रतिनिधी २ आणि इतर मागासप्रवर्ग प्रतिनिधी १, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी १ आणि भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून असे १५ अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सर्वसाधारण प्रतिनिधी मतदार संघातून मोहिनी माधवराव भणगे, राजकुमार नेमचंद दोशी, कन्हैयलाल गिरधरदास देवी, महादेव आजिनाथ फंड, ॲड. सुनील रामभाऊ घोलप, आशा प्रकाश क्षीरसागर, दिलीप शांतीलाल कटारे, कलिम अब्दुल रशीद काझी, प्रकाश मोतीलाल सोळंकी, अभिजीत अनिल वाशिंबेकर, महिला प्रतिनिधी मतदार संघातून सुनिता कन्हैयालाल देवी, प्रज्वला विजयकुमार दोशी, इतरमागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून चंद्रकांत पांडूरंग चुंबळकर, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून वंदना सुनील कांबळे. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून गोरख मच्छिंद्र जाधव हे उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. या सर्व उमेदवारांच्या निवडीची घोषणा सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी यांनी केली आहे.
गेल्या महिन्याभरापासून करमाळा अर्बन बँक निवडणुकीची चर्चा शहरभर चालू होती. ३० जानेवारी रोजी सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडून ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही निवडणूक बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांचे नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे. या निवडीने श्री देवी यांचेवर असलेला बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा असलेला विश्वास पुन्हा एकदा स्थापित झाला आहे.
करमाळा अर्बन बँकेच्या निवडणुकीत सभासद, ठेवीदार, कर्जदार व सर्व कर्मचारी यांनी जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासास पात्र राहून यापुढेही बँकेचा कारभार पारदर्शकपणे व विश्वासदर्शक पध्दतीने चालू राहिल. सर्व सभासद व कर्जदारांना बँके मार्फत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा यापुढील काळात प्रयत्न राहील. बँकेच्या आर्थिक अडचणी संपत आल्या असून लवकरच बँक पूर्वपदावर येत आहे. आत्तापर्यंत जसे सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही राहील; अशी आशा बाळगतो. – कन्हैयालाल देवी (चेअरमन- करमाळा अर्बन बँक)