गोंविद खोडवे यांच्या मृत्यू संदर्भात सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी.. - Saptahik Sandesh

गोंविद खोडवे यांच्या मृत्यू संदर्भात सहाय्यक अभियंता व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी..

कंदर प्रतिनिधी / बाळासाहेब सरडे :
कंदर : लाईटच्या डीपीवरील वीज कनेक्शन जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगार गोंविद बाबुराव खोडवे ( वय – २८) रा.येलडा ता अंबेजोगाई जि. बीड या तरुणाचा ६ फेब्रुवारीला विजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी विद्युत अभियंता आणि दोन कर्मचारी यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी कंदर येथील नागरिकांनी केली आहे.

याप्रकरणी पंडीत कारभारी खोडवे (रा, येलडा ता, अंबेजोगाई जि ,बीड ) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा चुलत भाऊ मयत गोंविद हा ६ फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता कंदर येथील जलाशयाच्या संपादीत जमिनी वरील अरीफ इनामदार यांच्या शेती लगत असणाऱ्या डीपी वरील पप्पु शिंदे यांचे केबल कनेक्शन जोडण्यासाठी डीपी वरती चढला असता, त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याप्रसंगी विद्युत ऑपरेटर किशोर तळेकर यांनी ज्ञानदेव तुकाराम लोकरे यांना अनधिकृत विद्युत पुरवठा बंद व चालु करण्याचे परमीट देवून त्याबाबत संबंधित विद्युत अभियंता यांनी कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता निष्काळजीपणाने दुर्लक्ष करून परस्पर संगनमत करून माझा चुलत भाऊ गोंविद खोडवे यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.

कंदर गावासाठी वीज पुरवठा करण्यासाठी तीन फीडर तयार करण्यात आले आहेत. कंदर बॅक वॉटर आणि कंदर व्हिलेज हे दोन फिडर बंद करून घेतले. मागील पंधरा दिवसापूर्वी कंदर भगीरथ वरून त्याच लाईनच्या खालून कमी अंतर ठेवून लाईन ओढली होती. अंतर पाच फूट ठेवणे गरजेचे होते तसे न करता कमी अंतर असल्यामुळे तारेला तार चिकटल्यामुळे बंद असलेल्या फिडरला करंट मिळाला त्यामुळे काम करत असताना त्याचा जागीच मृत्यु झाला असेही कंदर येथील नागरिकांनी म्हटले आहे.

कंदर येथील सहाय्यक अभियंता ओमकार परीट हे नियमीत गैरहजर राहत असतात. कंत्राटी कामगार गोंविद खोडवे यांच्या मृत्यूस परीट हे स्वतः जबाबदार असुन त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. या घटनेची करमाळा पोलिसात फिर्याद दाखल झाली असुन पुढील तपास निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!