शेतकऱ्याच्या मुलाचा पराक्रम – सौर उर्जेवर चालणाऱ्या ‘लॉंच’ची केली निर्मिती..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतकरी हा अनंत अडचणीवर मात करून आपली शेती आणि आपला परिवार सुधरविण्याचा नियमित प्रयत्न करीत असतो. यापेक्षाही शेतकरी आणखीन काही ना काही करतच असतात. याचेच उदाहरण म्हणजे भिवरवाडी (ता.करमाळा) येथील शेतकरी कुटूंबातील श्रीहरी जाधव या उच्च शिक्षित तरुणाने संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी लाँच विकसित केली आहे. या लाँचचा प्रवास यशस्वी ठरल्याने श्रीहरी जाधव यांचे करमाळा तालुक्यातून कौतूक केले जात आहे.
भिवरवाडी, ढोकरी, बिटरगाव (वांगी नं. १, २, ३ ), शेलगाव, सांगवी या परिसरातील नागरीकांना दैनंदिन कामासाठी तसेच वैद्यकिय सुविधा मिळविण्यासाठी इंदापूरला जावे लागते. यासाठी टेंभूर्णी मार्गे ७० किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी सुरूवातीला सन २०१९ मध्ये डिझेल इंजिनवरील लाँच सेवा सुरू केली. परंतू डिझेल महागल्यामुळे ती लाँचसेवा बंद पडली. यावर पर्याय म्हणून श्रीहरी जाधव यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीचा विचार केला. त्यानूसार श्री.जाधव व त्यांचे मित्र मंगेश जाधव या दोघांनी सौरऊर्जेवरील सर्व साहित्य आणून स्वत: सौरउर्जेवर चालणारी लाँच निर्माण केली आणि या लाँचच्या माध्यमातून ढोकरी ( बंडगर वस्ती) ते शाह या गावादरम्यान या लाँचने फेऱ्या मारून यशस्वी प्रवास केलेला आहे.
राज्यात सौरउर्जेवर चालणारी ही पहिलीच लाँच असून या लाँचची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे राज्यभरातून अनेकजण ही लाँच पाहण्यासाठी येत आहेत. सौरऊर्जेवरील लाँचमुळे कोणताही खर्च नाही, प्रदुषण नाही, प्रवाशाला धोका नाही. त्यामुळे अनेक पर्यटकही या लाँचमधून प्रवास करण्यासाठी येत आहेत. या लाँचचा शुभारंभ यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांचे हस्ते करण्यात आला.(लाँच सेवेसाठी संपर्क – ९६८९५८४५४६/ श्रीहरी जाधव – ८७८८३४१३०७) –
संबंधित व्हिडीओ :