छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निराधार वृद्ध व जेष्ठ नागरिकांना अन्नदान.. -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निराधार वृद्ध व जेष्ठ नागरिकांना अन्नदान..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्यावतीने श्रीराम प्रतिष्ठान येथे निराधार वृद्ध व जेष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेशभाऊ चिवटे, करमाळा मुस्लिम समाजाचे समाजसुधारक व करमाळा अर्बन बँकेचे संचालक हाजी कलीम काझी यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे उपाध्यक्ष पै.अफसर जाधव, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अशपाकभाई जमादार, उद्योजक रमेशभाऊ वीर , रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरजभाई शेख, करमाळा जामा मस्जिदचे विश्वस्त जमीरभाई सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशनचे उपाध्यक्ष जहाँगीर बेग, सचिव पिंटु शेठ बेग आदीजण उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गणेश भाऊ चिवटे यांनी सांगितले की, तमाम हिंदुस्थान जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य ची मुहुर्तमेढ उभी करून असंख्य मावळ्यांच्या साक्षीने मोगल राजवट संपुष्टात आणुन महाराष्ट्र व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . माझी राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात देखील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांचे विचार व आचरण आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.आज सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊनच मी काम करत आहे व नेहमी करणार आहे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

याप्रसंगी कलिम काझी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आमच्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच भारतातील व महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य व एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व ठरतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या न्याय्य दानाने, सामाजिक ऐक्याने, दुरदृष्टीने, सर्व धर्म समभाव व मानवतावादी विचार ठेवून जगाला आपल्या नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. सर्व समाजातील लोकांनी जीवन जगताना एकमेकांचा आदरभाव ठेवून सामाजिक ऐक्याला तडा जाणार नाही याची सार्वजनिक जीवन जगताना भान ठेवावे असे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार पिंटुशेठ बेग यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!