मांगी तलावातून डाव्या व उजव्या कालव्यामधून रब्बीचे आवर्तन सुरू – आमदार संजयमामा शिंदे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील मांगी तलावात यावर्षीच्या झालेल्या पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणीसाठा होवून हा तलाव १००% भरला होता, सध्या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मांगी मध्यम प्रकल्पातून आज (१९) सकाळी 10 वा. उजवा व डावा या दोन्ही कालव्याद्वारे रब्बीचे आवर्तन सुरू केले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
हे रब्बी आवर्तनाची पाणी पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसार दिले जाणार असून, जास्तीत जास्त पाणी वापर संस्थांनी पाणी मागणी अर्ज करावेत व भविष्यकाळात पाणीपट्टी भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले आहे.
गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने मांगी मध्यम प्रकल्पावरती अवलंबून असणाऱ्या विविध गावांमधून रब्बी आवर्तनाचे पाणी सोडण्याची मागणी आमदार शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली होती ,त्याची दखल घेऊन हे रब्बी आवर्तन सुरू केलेले आहे . बिटरगाव श्री या गावाला पाणी देण्याच्या दृष्टीने नियोजन झालेले असून सायफण टाकण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाकडे मागणी केलेली असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर बिटरगाव श्री या गावालाही मांगी मध्यम प्रकल्पाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
मांगी मध्यम प्रकल्पाचे उजवा व डावा कालव्याद्वारे रब्बी पिकांसाठी चे आवर्तन आज १९ फेब्रुवारी सकाळी १०.०० वाजता सोडण्यात आलेले आहे. तरी सदरचे पाणी हे मांगी पोथरे या गावांची मागणी आलेली असल्याने सोडण्यात आलेले आहे. सदरचे पाणी हे पुढील ८ दिवसंकरिता सोडण्यात आलेले आहे. निलज, खांबेवाडी, करंजे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांची पाणी मागणी आल्यास आवर्तनाचा कालावधी वाढविला जाईल. तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून वेळेत मागणी करण्याची नोंद घ्यावी. – संजय अवताडे (उपअभियंता ,पाटबंधारे विभाग)
