ऊत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेला सुरवात – विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर जंगी कुस्त्यांचे आयोजन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबाची यात्रेला महाशिवरात्री (दि.१८) पासून सुरूवात झाली आहे. पाच दिवसांची ही यात्रा असून २२ तारखेला या यात्रेची सांगता होणार आहे. यामध्ये कीर्तन, हरिजागर, छबीना, कुस्ती आदी कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
धार्मिक कार्यक्रमांमध्ये शिवलीलामृत ग्रंथ पारायण, लघुरुद्राभिषेक, कीर्तन, हरी जागर,श्रीस नैवेद्य, ब्राह्मण भोजन श्रीस अभिषेक असे नित्यनेमाने धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दि. १८ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेस ग्रंथ पारायण पार पडले. रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. सुरेशं थिटे महाराज यांचे कीर्तन झाले. रात्री ११ नंतर हरि जागर करण्यात आला.
आज दि १९ रोजी रात्री ९ ते ११ ह.भ.प. रणखांबे यांचे कीर्तन होणार असून रात्री ११ नंतर हरि जागर घेण्यात येणार आहे. दि २० रोजी ९ ते११ यावेळेत ह.भ.प. ओंकार महाराज यांचे कीर्तन व रात्री ११ नंतर हरि जागर होईल. दि २१ रोजी रात्री १२:०५ मि. श्री चा भव्य छबीना निघणार आहे. या छबिन्या समोर नयनरम्य असे शोभेचे दारूकाम होणार आहे. त्यानंतर गावातून रात्रभर मिरवणूक होईल.
दि २२ रोजी श्री ऊत्तरेश्वर आखाड्यांमध्ये दुपारी १ नंतर मल्ल्यांच्या जंगी कुस्त्या होणार. या कुस्त्यासाठी नामवंत पैलवानाची हजेरी लागणार आहे. या यात्रेसाठी करमाळा, कुर्डूवाडी आगाराने केम, कुर्डूवाडी व केम टेंभुर्णी अशा ज्यादा गाडया सोडाव्यात अशी मागणी देवस्थान ट्रस्टने केली आहे. तसेच यात्रे दिवशी इ १२वीची परिक्षा आहे. हे परिक्षा केंद्र यात्रा भरते त्या ठिकाणी आहे. या यात्रेचा विदयार्थाना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. हि यात्रा शांततेने पार पाडावी या साठी केम ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
