'विधवा महिला, कष्टकरी व्यक्ती, उल्लेखनीय कामगिरी केलेले युवक यांचा सन्मान' आदी विधायक उपक्रमांनी कविटगाव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा -

‘विधवा महिला, कष्टकरी व्यक्ती, उल्लेखनीय कामगिरी केलेले युवक यांचा सन्मान’ आदी विधायक उपक्रमांनी कविटगाव मध्ये शिवजन्मोत्सव साजरा

0

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : कविटगाव (ता.करमाळा) येथे शिवजयंती कार्यक्रम हा विविध विधायक कार्यक्रम आयोजित करून पार पाडला. यात विधवा महिला सन्मान व हळदी कुंकू कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवकांचा सन्मान, मोलमजुरी करणारे व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांचा सन्मान, सामान्य ज्ञान परीक्षा विजेत्या स्पर्धकांचा सन्मान, वह्या वाटप, व्याख्यान आदी विविध कार्यक्रमाने ही शिवजयंती पार पडली.

या कार्यक्रमात शिवव्याख्याते तुषार शेंडे (बारामती) यांचे अभ्यासपूर्ण व सखोल असे व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष व विधवा सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंझाडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्यानी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील, आदर्श शिक्षिका रोहिणी वीर आदीजन उपस्थित होते. त्यांनी उपस्थित महिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. “शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा…वाचून साजरी करा” असे आवाहन गणेश करे-पाटील यांनी यावेळी युवकांना केले.

गावातील विधवा स्त्रियांना आमंत्रित करून त्यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. वर्षानुवर्ष अनिष्ट रुढी व परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या समाजाचे या मन तयार करण्यासाठी सरपंच विद्याताई शिवाजीराव सरडे यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम पार पाडला. यामुळे उपस्थित सर्व स्त्रिया आनंदाने भारावून गेल्या होत्या. गावातील सुमारे ५० विधवा महिला या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. उपस्थित सर्व महिलांना ग्रा.पं.सरपंच विद्याताई सरडे यांच्याकडून उत्तम दर्जाच्या साड्या भेट देण्यात आल्या.

गावातील मोलमजुरी करणारे व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबांना रोहिदास पांडव यांच्याकडून संपूर्ण पोशाख भेट देण्यात आला.

याव्यतिरिक्त गावातील शाळेत छ.शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी,प्रमाणपत्र,मेडल श्री.श्रीकृष्ण भिसे यांच्या मार्फत देण्यात आली. तसेच रोख पारितोषिक श्री.साळुंके यांनी दिले.

मागील दोन वर्षात एम.पी.एस.सी.परीक्षेत उज्जल यश मिळवून गावाचे नाव अभिमानाने उंचावणारे युवक अक्षय चौधरी (वर्ग 1), पी.एस.आय.अर्जुन पांडव , पी.एस.आय.धनंजय गाडे , एस.टी.आय.महेश कवडे तसेच वैद्यकीय शिक्षण प्रवेश मिळालेल्या डॉ.विशाल जगदाळे , रुपाली भोसले, ज्ञानेश्वर चौधरी , शुभम जगदाळे तसेच महाराष्ट्रासाठी दोन गोल्ड व दोन सिल्व्हर मेडल मिळवणारे पै.यश सरडे , यासह इतर विद्यार्थ्यांचाही सन्मान शिवाजी पांडव (विक्रीकर निरीक्षक) यांच्या वतीने सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वहीचे वाटप कृषिभूषण श्री.दादासाहेब पाटील यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य डॉ.जोतीराम टकले यांनी भेट दिले. या कार्यक्रमासाठी श्री.गणेश शिंदे , अक्षय शिंदे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. याचा सर्व खर्च मा.सरपंच जोतीराम भोसले , ज्ञानेश्वर जाधव , अतुल चौधरी यांनी केला.कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिवप्रेमी तरुण,शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत ग्रामस्थांना एकवण्यात आले.

हा कार्यक्रम पार पडण्यासाठी अंगणवाडी सेविका मनीषा जगदाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भिसे व रोहिणी वीर यांनी केले. शेवटी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हटले की,डी जे च्या आवाजात प्रचंड खर्च करून नाच गाण्या सह मिरवणूक अशीच सर्वत्र स्थिती असते पण या अनावश्यक खर्चास फाटा देत,शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमींनी हा कार्यक्रम आयोजित केला.

शिवाजीराव सरडे (सामाजिक कार्यकर्ते, सरपंच प्रतिनिधी,कविटगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!