करमाळ्यामध्ये शिवजयंती मधून हिंदू -मुस्लिम एकतेचे दर्शन – जामा मस्जिद कडून मिरवणूकीमध्ये शिवरायांना पुष्पहार अर्पण

करमाळा (सुरज हिरडे) : करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य दिव्य मिरवणूक फुलसौंदर चौकातील जामा मस्जिद समोरून जात असताना करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या कृतिमधून हिंदू -मुस्लिम एकतेचे दर्शन दिसून आले.
याआधीही करमाळ्यामधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिसून आले आहे. करमाळा येथील जामा मस्जिद मधून गणेशोत्सवामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी गणेश मूर्तींवर जामा मशीद मधून फुले टाकण्याचा उपक्रम केला जात असतो. करमाळ्यात अनेक वेळेला गणेश मंडळांचे अध्यक्षपद मुस्लिम समाजातील युवक भूषवितात. इथे रमजानच्या महिन्यामध्ये, हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजित केल्या जात असतात. मुस्लिम बांधवांकडूनही रमजान ईद दिवशी शीरखुर्मा गुलगुले खाण्यासाठी हिंदू बांधवाना आमंत्रित केले जाते तर हिंदू बांधवांकडून दिवाळीमध्ये मुस्लिम बांधवांना फराळासाठी बोलावले जाते. अशाप्रकारे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन करमाळ्यामधून नेहमीच पाहायला मिळत असते जे की सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
छत्रपती शिवराय हे एकात्मतेचे प्रतीक होते हे या शिवजयंतीच्या मिरवणुकीतील कृतीने दिसून आले. ही मानवता छत्रपती शिवाजी महाराजांनीच शिकवली. याच मानवतेवर आज करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव चालतोय याचा मला अभिमान वाटतो. आमचे मुस्लिम बांधव म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया कोणत्या धर्माविरुद्ध नव्हत्या कोणत्या जातीविरुद्ध नव्हत्या व कोणत्या वर्णभेदा विरुद्ध नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया या जुलमी अन्यायाविरुद्ध होत्या. त्या राजकीय लढाया होत्या. त्यामुळे छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माते ठरले. या स्वराज्याचा अनमोल धागा म्हणजे सर्वधर्मसमभाव यात कोणताच भेद नाही हेच छत्रपतींच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य आहे आणि आम्ही त्याच स्वराज्याचे मावळे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाचे, विचाराचे नाते कधी पण श्रेष्ठच असते करमाळ्यामध्ये हम सब एक है हिंदू-मुस्लीम भाई – भाई है.
– सचिन अशोक काळे
मा.ता. अध्यक्ष मराठा सेवा संघ ,करमाळा.
