जनतेने जर विश्वास ठेवला तर आदिनाथ कारखान्यातून सोन्याचा धूर काढल्याशिवाय राहणार नाही :- माजी आमदार नारायण पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.११) : आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांचे मंदिर आहे, हा कारखाना चांगला चालला पाहिजे तालुक्यातला ऊस हा तालुक्यातच गाळप झाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योगदान त्यांना मिळालेच पाहिजे, जनतेने जर विश्वास ठेवला तर या आदिनाथ कारखान्यातून सोन्याचा धूर काढल्याशिवाय हा नारायण पाटील शांत बसणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी आदिनाथ कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रतिपादन कार्यक्रम समारंभाप्रसंगी केले.
याप्रसंगी पुढे बोलताना माजी आमदार श्री.पाटील म्हणाले की, आदिनाथ कारखान्याचा हंगाम हा वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या जीवावर चालणार आहे, शेतकऱ्यांनी जर विश्वास टाकून आदिनाथ कारखान्याला ऊस दिला तर भविष्यकाळात हा आदिनाथ कारखाना ऊर्जित अवस्थेत येणार आहे, आदिनाथ हा तीन वर्षापासून बंद अवस्थेत आहे मला या संदर्भात कोणालाही नावे ठेवायची नाहीत परंतु हा कारखाना चांगल्या रीतीने चालला पाहिजे भविष्यकाळातही हा कारखाना चांगल्या स्थितीत चालण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आदिनाथ कारखाना सुरू करणेकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी नामदार प्रा.राम शिंदे यांचे आदिनाथ कारखाना सुरू करणे कामी मोलाचे सहकार्य लाभले आहे.
“आदिनाथ”साठी कर्मवीर गोविंदबापू पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, माजी आमदार रावसाहेब पाटील, गिरधरदास देवी, गुरुलिंग बाप्पा घाडगे, पन्नालाल लोणावर या जुन्या माणसांनी या आदिनाथ कारखान्यासाठी मोठे योगदान दिले आहे आणि आम्ही हा कारखाना चालू स्थितीत ठेवून त्यांच्या आत्म्याला समाधान लागेल असेच करू असेही माजी आमदार नारायण पाटील यांनी म्हटले आहे.
‘आदिनाथ’ कारखान्यासाठी एकत्र आलो.. बागल गट हा स्वतंत्र आहे व नारायण पाटील गट हा स्वतंत्र आहे आम्ही आदिनाथ कारखान्यासाठी एकत्र आलेलो आहोत, केवळ आदिनाथ कारखाना सुरू करण्यास पाटील गट हा बागल गटासोबत आला आहे, आम्ही कारखान्याच्या सत्तेत नव्हतो, बागल गट हा कारखाना सत्तेत होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रशासकीय व्यवस्थापनाला पत्रव्यवहार केले, तसेच इतर नेत्यांच्या गाठीभेटी घेणे कारखाना सुरू करणेसाठी आदी प्रयत्न आम्ही केले. सध्या कारखाना सुरू होण्यासाठी बागल-पाटील एकत्र आहेत, भविष्यातील निवडणुकांसाठी आम्ही एकत्र येवू हे आता लगेच सांगता येणार नाही, परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येतील.
– माजी आमदार नारायण पाटील.