करमाळ्यात तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू – २२ फेब्रुवारी पर्यंत मुदत

करमाळा(दि.१३): २०२४-२५ या हंगामासाठी एनसीसीएफ मार्फत तूर खरेदी करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तर्फे करमाळा तालुक्यासाठी श्री विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्थेला तूर खरेदी केंद्र म्हणून मंजूर करण्यात आले आहे.
तूर खरेदीबाबत अधिक माहिती देताना या संस्थेचे सचिव सुजित बागल म्हणाले की, करमाळ्यात तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.ज्या शेतकऱ्यांना तुर विक्री करावयाची आहे अशा शेतकऱ्यांनी करमाळा मार्केट कमिटीच्या आवारातील डीसीसी बँकेचे शेजारील कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे घेऊन नोंदणी करावी. यासाठी सन २०२४-२५ ची तुरीची नोंदणी असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड,बँक पासबुक, ८-अ आदी कागदपत्रे घेऊन संस्थेच्या कार्यालयात यावे. ही नोंदणी करण्याची मुदत 22 फेब्रुवारी पर्यंत असल्याचेही त्यांनी सांगितले.






