४ वर्षांचे रखडलेले काम ८ दिवसांत पूर्ण करून दिले – मला भावलेले स्व. दिगंबराव बागल मामा
माजी राज्यमंत्री व करमाळा तालुक्याचे माजी आमदार स्व. दिगंबरराव बागल यांच्या १३ मार्च रोजी असलेल्या जयंतीनिमित्त प्रा.पन्हाळकर यांनी स्व. बागल यांच्याविषयी एक आठवण सदर लेखात लिहिली आहे.
इसवी सन २००० साली मी उन्हाळ्याच्या सुट्टीला गावी नेरले येथे आल्यानंतर सहज करमाळा येथे गेलो होतो. मला अशी बातमी समजली की उद्या करमाळा येथे आमसभा आयोजित केली आहे. तेव्हा मी आम सभेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. स्व. दिगंबरराव बागल हे त्यावेळी करमाळा तालुक्याचे आमदार होते. आम सभेला सुरुवात झाली. आम सभेमध्ये प्रस्ताविक झाल्यानंतर आमदार साहेबांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार साहेबांचे कौतुक करून आमच्या गावातील हे काम झाले तालुक्यातील अशा पद्धतीने काम झाली असा पाढा वाचण्याचा प्रयत्न केला सर्व कार्यकर्ते सकारात्मक कार्य होत आहे असे सांगत होते. जेणेकरून तालुक्यांमध्ये कोणाच्याही समस्या नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न करत होते, हे चालू असतानाच मी मध्येच उठलो आणि माझी व्यथा मी मांडण्यास सुरुवात केली.
मी म्हणालो आमदार साहेब प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कार्यपद्धतीची प्रशंसा करत आहे याचा मला आनंद वाटला परंतु माझे वडील एक अशिक्षित शेतकरी असून त्यांनी 1996 साली एम एस ई बी चे तीन एचपी चे विहिरी वरील पंपाचे कोटेशन भरलेले आहे, परंतु आज तागायत विहिरी वरती कनेक्शन मिळालेले नाही परंतु आपल्याशी संपर्कात असणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची या वर्षातील कोटेशन असले तरी त्यांच्या विहिरीवर कनेक्शन मिळालेले आहे. त्यावर आमदार साहेबांनी मला तुमच्याकडे पुरावा काय आहे असे विचारले त्यानंतर मी त्यांना मी वारंवार एम एस ई बी कडे केलेले अर्ज, ग्राहक मंच यांच्याकडे केलेली तक्रार व त्याची पोच हे सगळे पुरावे दाखवले. त्यानंतर आमदार साहेबांनी एम एस ई बी चे मुख्या अभियंता कोळी साहेब यांना उभे केले आणि हे सर्व बोलतात ते सत्य आहे का विचारले त्यावेळेस कोळी साहेब एरवी भेटल्यानंतर ताठ पणे बोलणारे लाजिरवाणे आवाजात साहेब मी त्यांचं काम करतोय असं सांगितलं, त्यानंतर देखील मी पुन्हा माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदार साहेब म्हणाले सर तुम्ही आता शांत रहा तुम्ही सुट्टी संपून जाण्यापूर्वी तुमच्या विहिरीवरती कनेक्शन मिळेल आणि आश्चर्य म्हणजे आठ दिवसात माझ्या विहिरी वरती नऊ लाईटचे पोल सहित विजेचे कनेक्शन मिळाले आणि माझे क्षेत्र बागायत होऊन त्यावर्षी उत्पन्नामध्ये फार मोठी वाढ झाली. तेव्हा मला आम सभेचे महत्त्व समजले.
माझे काम झाल्यानंतर माझ्या शेजारचे दशरथ कोपनर ज्यांचे माझ्या पूर्वी दोन-तीन वर्ष अगोदर कोटेशन होते त्यांना देखील वीज नव्हती परंतु ते आमदार साहेबांना भेटायला घाबरत होते. करमाळ्याला गेल्यानंतर ते नेहमी मामांच्या बंगल्यासमोर जायचे आणि परत माघारी यायचे असे चार-पाच वेळा त्यांनी केले होते. एके दिवशी मामांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती एक महिना झालं पाहतो अनेक वेळा आपल्या ऑफिसच्या पुढून जाते तेव्हा त्यांनी P.A ला पाठवून त्यांना बोलावून घेतलं आणि विचारले आपण अनेक वेळा माझ्या घराच्या पुढून तसेच ऑफिसच्या पुढून येऊन गेलेला मला पहावयास दिसले आहे म्हणून मी तुम्हाला खास करून बोलवले आहे तेव्हा तुमचं काय काम आहे हे सांगा कोपनर यांनी आपल्या विजेची हकीकत सांगितली व म्हणाले की पन्हाळकर सरांच्या शेजारीच माझे शेत आहे तेव्हा मला देखील अशाच पद्धतीने वीज मिळावी तेव्हा आमदार साहेबांनी कुठलाही विचार न करता एम एस ई बी अभियंता यांना फोन करून दशरथ कोपनर यांची ताबडतोब लाईट बसवा असा आदेश दिला आणि त्यांचेही काम झाले.
ज्या वर्षी उन्हाळ्यात माझे काम झाले त्यावर्षीच्या उन्हाळ्यात मी एका लग्न समारंभाला कोंढेज येथे गेलो होतो त्या लग्न समारंभात मामा हे प्रमुख अतिथी म्हणून आले होते एवढ्या गर्दीमध्ये मामांनी मला ओळखले आणि पन्हाळकर सर आपले लाईटचे काम झाले का? असे विचारले तेव्हा सर्व कार्यकर्ते माझ्याकडे पाहत होते मला त्यांनी जवळ बोलावलं आणि काम झाल्याचं मी सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर देखील अतिशय प्रसन्नता दिसून आली. काम झाल्यानंतर मला फोन करून का सांगितले नाही किंवा समक्ष का भेटला नाही याबद्दलही त्यांनी मला विचारणा केली. असे मला भावलेले आमदार करमाळा तालुक्यामध्ये होऊन गेले याचा मला सार्थ अभिमान आहे .
✍️ प्राध्यापक धनंजय पन्हाळकर, नेरले तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, Mo. 9423303768