शब्दांच्या पलीकडचं नातं -

शब्दांच्या पलीकडचं नातं

0

“पाळीव प्राणी आपली काळजी घेणाऱ्यांना कधीच विसरत नाहीत. त्यांच्या मनात माणसांप्रमाणे शब्द नसले तरी ओळख, माया आणि कृतज्ञता कायम जिवंत राहते. आपण दिलेल्या प्रेमाची, दिलासा देणाऱ्या हाताची आणि पोट भरवणाऱ्या मायेची ते कायम आठवण ठेवतात. कितीही दिवस दूर राहिलं तरी कुत्रा मालकाला पाहताच उड्या मारतो, मांजर जवळ येतं प्रेमाने माणसाच्या पायाला अंग घासत, गाय–बैल माणसाला पाहून शांतपणे जवळ येतात. त्यांचं भावनिक नातं शब्दांच्या पुढे जाऊन मनाला स्पर्श करणारं असतं, म्हणूनच पाळीव प्राणी आपल्यावर केलेल्या उपकारांची, प्रेमाची आणि जपणुकीची आठवण आयुष्यभर हृदयात जपून ठेवतात.” याची प्रचिती आम्हाला आली.

आमच्या घरी पाळलेले मांजर रविवारी दि. २ नोव्हेंबरपासून घरातून गेले होते. संपूर्ण कुटुंब मांजराच्या शोधात होते. पत्नी रोहिणी, मुलगा ऋग्वेद, ओम भिल्ल, समर्थ आणि शिव रामदासी हे सर्वजण अखंडपणे मांजर शोध मोहिमेत होते. गावातील अनेक लोकांनी त्याला पकडण्याचा, शोधण्याचा किंवा दिसल्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. ते अतिशय घाबरलेले असल्यामुळे कोणाजवळ येत नव्हते.

पंधरा दिवस ते गोडसे गल्ली ते केंगार घर परिसरात फिरत राहिले.  दरम्यान आम्ही हे मांजर शोधून देणाऱ्यास बक्षीस देखील जाहीर केले होते. अखेर पोटात काहीच नसल्याने ते शनिवारी जलील मोमीन यांच्या घराजवळ आले. अंगात त्राण नसल्याने ते भेळकांडत होते. जलील यांना गावातील ग्रुपवर हरवलेल्या मांजराची पोस्ट आठवली. त्यांनी लगेच मला फोन केला. योगायोगाने ऋग्वेद त्याच परिसरात शोध घेत होता. मी त्याला फोन केला. तो लगेच त्या ठिकाणी गेला आणि त्याचा आवाज ऐकताच मांजर हळूहळू ओरडत त्याच्याकडे येऊ लागले. हे दृश्य पाहून मोमीन परिवाराच्या डोळ्यातही पाणी आले.

जनावरे ही मालकावर अंतःकरणापासून प्रेम करतात, याची आम्हाला प्रचिती आली. आम्हाला खूप जण वेडेपणा समजत होते; काहीजण दुसरे पाळण्याचा सल्ला देत होते. पण बरेचजण “सापडेल, येईल” असे सांगून आमचा उत्साह टिकवून ठेवत होते. आणखी काही दिवस गेले असते तर कदाचित विपरीत घडले असते. परंतु नियतीला हरवायचा आमचा निश्चय यशस्वी झाला. आणि आमच्या ‘मन्या’ने काळावर विजय मिळवत आमच्या सहवासाची वीण आणखी घट्ट केली. पूर्वजन्माचे ऋणानुबंध…

ज्यांनी मदत केली, आधार दिला त्या सर्वांना दंडवत. जलील मोमीन आणि त्यांच्या परिवाराचे शतशः आभार मानले. शेवटी एवढंच म्हणावेसे वाटतं की, “प्राणिमात्रांवर दया करा, ते आपले उपकार विसरत नाहीत”

✍️ श्रीराम तर्कसे, केम, तालुका करमाळा

(शब्दांकन – संजय जाधव, केम)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!