श्रमशक्तीद्वारे ग्रामीण विधवा सन्मान योजना – विधवांच्या सन्मानासाठी, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी

ग्रामीण भारतात विधवा महिला अनेकदा सामाजिक बहिष्कार, आर्थिक संकट आणि मानसिक तणावाचा सामना करत जगतात. पतीच्या निधनानंतर मिळणारा सन्मान, स्थान आणि आत्मविश्वास कमी होतो. अनेकांना गावातील धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांतही दुय्यम वागणूक दिली जाते. अशा परिस्थितीत, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नराळे ग्रामपंचायतीने एक अभिनव पाऊल उचलले आहे — “श्रमशक्तीद्वारे ग्रामीण विधवा सन्मान योजना”.

योजनेची उद्दिष्टे
- विधवा महिलांना आर्थिक स्वावलंबनातून त्यांना उन्नतीची संधी देणे.
- गरीब शेतकऱ्यांच्या शेतीवरील मजुरीचा खर्च कमी करणे.
- दोन्ही घटकांचा परस्पर लाभ — महिलांना रोजगार, शेतकऱ्यांना मजूर.

योजनेची रचना
३० दिवसांच्या कालावधीत, पात्र विधवा महिलांना स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये मजुरीचे काम दिले जाते. रोजंदारी ३०० रुपये असून त्यातील ५०% रक्कम शेतकरी व उर्वरित ५०% ग्रामपंचायत देणार. याशिवाय, रोज २ किलो अन्नधान्याचीही तरतूद आहे. महिलांना हे अन्नधान्य घेणे ऐच्छिक ठेवले आहे.
कामाची निवड ही शेतकऱ्यांच्या गरजेनुसार केली जाते. कामाचे स्वरूप शेतीसंबंधी असले तरी, शेतकऱ्यांकडे काम नसल्यास ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कामांत मजुरी उपलब्ध करून देते.

सामाजिक बदलाकडे वाटचाल
ही योजना केवळ रोजगारपुरती मर्यादित नाही. यामध्ये विधवा महिलांना —
- धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
- पुनर्विवाहाची सामाजिक भीती दूर करणे व कायदेशीर सल्ला
- शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे
- मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन
अशा विविध बाबींमध्ये मदत मिळते. विशेष म्हणजे, या योजनेत विधवा प्रथा, भेदभाव आणि सामाजिक बहिष्कार नष्ट करण्याचा स्पष्ट संकल्प आहे.

शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर
गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी खर्चात मजूर उपलब्ध होतात. यामुळे वेळेची व पैशांची बचत होते, कामाच्या गुणवत्तेत सुधारणा होते आणि शेतीवरील भार हलका होतो.
सुरक्षा आणि हक्क
कामावर महिलांच्या सुरक्षिततेसाठी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती कार्यरत असणार आहे. हेल्पलाइन क्रमांक ओळखपत्रावर दिले जातात. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावली आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अपघात किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक मदतही दिली जाते.

निधीची उभारणी
ग्रामनिधी, शेतकऱ्यांचा वाटा, शासनाचा निधी, CSR फंड तसेच लोकप्रतिनिधींचा निधी अशा विविध स्त्रोतांतून योजनेसाठी निधी उभारला जातो. भविष्यात ग्रामपंचायतीच्या जागेत फळझाडे लावून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याचाही मानस आहे.
परिणाम आणि अपेक्षा
या योजनेमुळे —
- विधवा महिलांना गावातच कामाची हमी मिळते.
- स्थलांतर थांबते, मुलांचे शिक्षण खंडित होत नाही.
- महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक जाळे बळकट होते.
- गावातील एकोप्याची भावना दृढ होते.

नराळे ग्रामपंचायतीची ही योजना सामाजिक संवेदनशीलता, आर्थिक नियोजन आणि ग्रामविकास यांचा सुंदर संगम आहे. जर अशा योजना राज्यभर राबवल्या गेल्या, तर ग्रामीण समाजातील विधवा महिलांचा सन्मान आणि जीवनमान दोन्ही उंचावतील.
योजनेची संकल्पना व लेखन –

प्रमोद झिंजाडे, अध्यक्ष, महात्मा फुले समाजसेवा मंडळ, करमाळा, मो.77759 03052
