आईचा असाही एक प्रवास!

माणसाचा जीवनप्रवास हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कुणी सुखसोयींमध्ये जन्मतो, कुणी संघर्षातून आपलं जीवन घडवतो. पण एखाद्या शेतात मजुरी करणाऱ्या आईचा प्रवास तिच्या मुलासोबत थेट पंतप्रधान सदना पर्यंत पोहोचतो, ही कल्पनाही अविश्वसनीय वाटते. पण आज ही गोष्ट सत्यकथा आहे, आणि ती म्हणजे चोंडी ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथील श्रीमती भामाबाई शंकर शिंदे यांची.
भामाबाईंचं माहेर पोथरे (ता. करमाळा). वडील काशीनाथ कडू आणि आई हौसाबाई .त्यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबातील. घरात थोडीफार शेती, पण त्यावर संसार भागणं कठीण. लग्न झालं ते चोंडी गावातील शंकर शिंदे यांच्याशी. पती साध्यासुध्या कुटुंबातले, घरी अल्पशेती ती ही पावसावरचं अवलंबून, पाऊस आलातर काहीतरी, नाहीतर हाती काहीच नाही. त्यामुळे शंकर शिंदे यांनी तब्बल सोळा वर्षे देवकर कुटुंबात सालगडी म्हणून कष्ट केले, तर भामाबाईनी दुसऱ्याच्या शेतात खुरपणी करून संसाराचा गाडा ओढला.

या दांपत्याला तीन मुली – शहाबाई, किसाबाई आणि शोभा, तर एकुलता एक मुलगा – राम.
मुलींचं लग्न, संसाराची जबाबदारी ही मोठी चिंता. पण भामाबाईंच्या मनात एकच ध्यास – “माझा मुलगा शिकला पाहिजे, चांगलं भविष्य घडवलं पाहिजे.”त्यामुळे त्यांनी छोट्या वयातच रामला पोथरे येथे मामाकडे शिकायला पाठवलं.

त्यावयात म्हणजे 11 व्या वर्षी राम मामाकडे आला पण तो 11 ते 16 याकाळात शाळेत जाईल तेवढाच बाहेर, नाहीतर माझ्या सोबतच होता, आम्ही जेवणापासून ते अभ्यासापर्यंत म्हणजे मुक्कामाला एकत्रच होतो. त्यावेळी रामची आई पोथरेला आली की मला नेहमी एकच सांगायची “माझ्या मुलाला चांगले संस्कार दे, त्याला उभं कर.” आईच्या या आर्ततेमुळे आणि कष्टामुळे,जिद्दीच्या जोरावर राम शिंदे शिक्षणात पुढे गेले.

त्यांचं उच्च शिक्षण झालं प्राध्यापक झाले. पुढे गावची जबाबदारी स्वीकारली. चोंडीचे सरपंच झाले, जामखेड पंचायत समितीचे सभापतीपद परिवाराकडे खेचून आणले. त्यानंतर सन 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या कष्टाने उमेदवारी मिळवली. ती निवडणूक दिग्गज नेत्यांच्या विरोधात होती, पण प्रा.राम शिंदे यांची पहिली निवडणूक असूनही त्यांनी या सर्वांवर मात करत दहा हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे वळण मिळाले –पुढे मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली, कार्याचा धडाका वाढवला आणि राज्यातल्या महत्त्वाच्या नेतृत्वाशी थेट संबंध आला. म्हणतात ना ..”जेवढे यश तेवढेच शत्रू वाढतात”. सर्व अलबेल आहे असे वाटताना सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसला,तसाच फटका 2024 मध्येही बसला. पण पक्षनिष्ठा, चिकाटी आणि सामाजिक कामगीरी पाहून पक्षाने त्यांना विधान परिषदेत आमदार केलं आणि विधानसभा निवडणुकीनंतर चक्क विधानपरिषद सभापतीपदाची जबाबदारी दिली.

आपल्याला पद मिळाल्यानंतरही सभापती शिंदे यांनी आईचं देवत्वाचं पद कायम ठेवलं. त्यांनी आई ला पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घडवून आणल्या.महाराष्ट्राच्या विधानभवनात नेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह अन्य मंत्र्यांच्या भेटी घडवल्या. आपण काय काम करतो , कोठे असतो ते दाखवले. प्रा.राम शिंदे जेव्हा आपल्या आईला (भामाबाई शिंदे) सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना भेटतात, तेव्हा खरं तर त्या सर्व कष्टाचं चीज झालेलं दिसतं.

एकेकाळी दुसऱ्याच्या शेतात खुरपणी करणारी आई ,आज मुलासोबत पंतप्रधान सदनात विधान भवनात पोहोचते – हीच खरी यशोगाथा आहे.!
तुकाराम महाराज म्हणतात : तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे । संसारी जन्मीजे याची लागी ।। लेकराचं मोठं होणं, लेकराच्या नावानं आई-वडिलांची ओळख निर्माण होणं हे आई-वडीलांच्या आणि मुलांच्या जन्माचं सार्थक असतं..

पूर्वी “भामाबाईचा राम” म्हणून ओळखला जाणारा मुलगा आज विधान परिषदेचा सभापती आहे.
आणि आज भामाबाईंची ओळख “सभापती प्रा. राम शिंदे यांची आई.” अशी झाली आहे.
हा प्रवास केवळ एका कुटुंबाचा नाही, तर आईच्या कष्टांचा, त्यागाचा आणि मुलाच्या जिद्दीचा आहे.एवढेच नाहीतर भामाबाईंचं आयुष्य आणि प्रा.राम शिंदेंचा संघर्ष हा समाजासाठी प्रेरणादायी ठेवा आहे.
– डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे,करमाळा.मो.न. 9011355389

