पुस्तक समीक्षण : 'एक भाकर तीन चुली' - Saptahik Sandesh

पुस्तक समीक्षण : ‘एक भाकर तीन चुली’

ते २७ दिवस तिच्या वाट्याला आले नसते तर ही कादंबरी जन्माला आलीच नसती…आणि गरीब मराठ्यांना आरक्षण का गरजेचे आहे हे ही कादंबरी वाचून पुन्हा अधोरेखित होते.

“एक भाकर तीन चूली” (Ek Bhakar Tin Chuli) या पुस्तकाचे नाव अनेक प्रसार माध्यमावर ऐकत होतो. त्याचबरोबर त्या पुस्तकाचे मुखपृष्ठावरील चित्र पाहिल्यानंतर दिसणारी भाकर आणि ती माता मनाला हुरूर लावत होती. तेव्हा एक दिवस मी आमच्या महाविद्यालयातील प्राचार्यांना या पुस्तकाबद्दल थोडी कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी ग्रंथपाल यांना सांगून ते पुस्तक मागवले व पुस्तक आल्याबरोबर ग्रंथपाल यांनी माझ्या नावावर नोंद करून मला दिलं.

पुस्तक हाती पडल्यानंतर वाचण्यापूर्वीच माझ्या मनामध्ये पुस्तकाबद्दल जो अंदाज होता तो असा होता की, एका विधवा मातेने आपल्या तीन मुलांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करून त्यांना चांगल्या उच्च पातळीवर नेऊन ठेवले असताना वृद्धपकाळामध्ये तिला एका भाकरीसाठी तीन चुलीची वाट पाहावी लागते अशा आशयाची कथा असेल अशी माझी धारणा होती परंतु पुस्तक वाचायला घेतलं आणि त्या पुस्तकातील खरे गुड उलघडण्यास सुरुवात झाली.
पुस्तकातील कथेचा कालावधी साधारण 1955 ते 1975 च्या दरम्यानचा असावा. माझा जन्म 1968 चा असल्यामुळे मी लेखकापेक्षा हा कालावधी थोडा जवळ पाहिलेला आहे त्यामुळे मला वाचन करताना प्रत्येक शब्द न शब्द ऐकल्यासारखं आणि पाहिल्यासारखा वाटू लागला. लेखकाच्या जन्मापूर्वी 25 वर्षाच्या कालावधीतील माहिती लेखकाने अतिशय कुशल पद्धतीने मिळवून त्याचे विवेचन तेव्हाच्या  बोलीभाषेमध्ये अतिशय सुंदरपणे रेखाटले आहे. पुस्तकातील प्रत्येक ओळ वाचल्याशिवाय वाचक पुढे जाऊ शकत नाही असे लेखकाने वाचकाला जखडून ठेवले आहे.

ज्याप्रमाणे पारू कष्टाने जखडली त्याच पद्धतीने वाचक देखील पुस्तक वाचताना जखडून गेल्यासारखा दिसतो. पुढे काय? पुढे काय? असे नेहमी वाचकाला वाटत राहते आणि हातातील पुस्तक वाचक सोडण्यास तयार होत नाही. शेतात झालेला पारूचा जन्म हा खूप वेदनादायी होता तरी देखील त्या काळातील कुशल माता-भगिनींनी तिची सुखरूप सुटका केली तेव्हा आजच्या कोणत्याही सर्जनला डॉक्टरांना लाजवेल असे कार्य पारूची आई तुळसा हिच्या सवंगडी मैत्रिणीने केले आहे. सासू-सासर्‍याने जरी तिला घरात घेतले नसले तरी धाकटा दीर पाठीशी उभा राहून त्यांनी अतिशय कुशल पद्धतीने तुळसा व पारू यांना मदत केली यावरून दिर भावजय यांचे अतूट नाते  दिसून येते. माझी आई  जेव्हा जात्यावर  ओवी म्हणत असायची तेव्हा तिचे शब्द मला आठवले

“सण आला बाई बैलपोळ्याचा
केली जोड गव्हाची खीर !
बंधू अनु नको करू रे चिंता माझी  
पाठी माझा उभा आहे धाकटा दीर!”

पारूचा बालविवाह झाला त्यानंतरचे 27 दिवस अंगावर शहारे आणणारे वाटले. खरंतर मुलगी मॅच्युअर किंवा शहाणी झाली नसेल तर त्या काळातील सासवा सुनेला स्वतःच्या अंथरुणात झोपूवून घेत असत. इथे मात्र नणंद आणि सासू यांना मात्र स्त्रित्वाची जाणीव नसल्यासारखे वाटत आहे.
खरे तर त्या कालावधीमध्ये अनेक बालविधवा आयुष्यभर आई-वडील भाऊ यांच्या घरी राहून आपलं सर्व आयुष्य जीर्ण करून घेत. मोठ मोठ्या श्रीमंताच्या वाड्यामध्ये एखादी तरी  बालविधवा दिसत असे .

बाळशीराम व तुळसा यांनी मात्र पारूचा दुसरा विवाह करण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि तो यशस्वी देखील झाला. तिला शहाजी पासून चार आपत्ती झाली अतिशय सुंदर संसार चालत असतानाच घरातील एकेक मोहरा निघून पडला पारूचा पुनर्विवाह झाल्याबरोबर मला कथेची संकल्पना किंवा दिशा स्पष्ट झाली पारूचे तीन विवाह होणार हे मी गृहीतक धरले जेव्हा शहाजी मरण पावला त्यानंतर मला असं वाटलं होतं की पारूचा धाकट्या दिराबरोबर विवाह होईल परंतु तोही थोड्या दिवसात मरण पावला त्यामुळे चार लेकरा नंतर तिसरी चूल पारू करेल असे वाचकाला वाटत नव्हते परंतु येवले मावशीच्या मदतीने रामाबरोबर पारूचा तिसरा विवाह झाला आणि कथेतील गुड उलगडत गेले.

आजोबा रंगा,पहिली सासू शेवंता, नणंद अलका, दुसरा चुलत दीर नरपती, धरणाच्या कामावरील मुकादम आणि तिसरा चुलत दीर कोंडीबा, हे सर्व या कथेतील खलनायक म्हणून काम करत आहेत. तसेच पारू पेक्षा हलक्या जातीचे परंतु पारूला जीवाला जीव देणारे माणसं या कथेमध्ये मिळाली ती म्हणजे नंदीबैलवाले, मुसलमान कुटुंब, येवले मावशी, गायकवाड कुटुंब यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन पारोला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करून जीवन जगण्यास प्रोत्साहन दिले आहे. पारुच्या जातीतील एकही माणसाने पारोला मदतीचा हात दाखवला नाही किंवा सहानुभूती देखील व्यक्त केले नाही हे अतिशय दुर्दैवीपणाचे लक्षण आहे. खरंतर या कथेमध्ये गावातील परिसरातील कोणत्याही व्यक्तीने पारू व पारूच्या कुटुंबाला त्रास तिला नसून तिला फक्त भावकी यांच्याकडूनच त्रास झालेला आहे.

पारूच्या मुलाला देखील एखादा चांगल्या कुटुंबातील मित्र भेटून त्याने कधीही मदतीचा हात दाखवला नाही याची खंत वाटते. बबुच्या गुरुजींनी अनेक वेळा सहानुभूती दाखवली आहे परंतु त्याचे म्हणावे असे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत. खरं तर मागास विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश मिळायचा परंतु बबु हा मराठा समाजातील असल्यामुळे त्याला गणवेश मिळाला नाही तेव्हा बबुच्या मनामध्ये आपण खालच्या जातीचे असायला पाहिजे होतं असे वाटत राहिले.

गरीब मराठा आरक्षणाची बीजे या ठिकाणी पेरली गेली आहेत. अभ्यासात एवढा हुशार असताना देखील त्याला एखाद्या श्रीमंत घरातील मुलांनी मदतीचा हात करणे आवश्यक वाटत होती. परंतू पारूचा तिसरा विवाह झाल्यामुळे तिला वाळीत टाकण्यात आलेले दिसून येत आहे. पारुला झालेली शारीरिक मारझोड तिच्यावर झालेले अतिप्रसंग हे मनात खंत करून राहतात. न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था पारूच्या कधीही मदतीला धावून आलेली दिसत नाही. बबुला शिक्षणासाठी कमलबाईने केलेले प्रयत्न पुढील कथेला उभारी देण्यासारखे वाटतात आणि कथेचा शेवट थोडासा प्रगतीपथावर पोहोचल्यासारखा वाटतो. बबु हा पुढे शिकून किशोर काळे सारखा डॉक्टर होईल, लक्ष्मण गायकवाड सरकारी लेखक होईल, राजेंद्र भारूड सारखा कलेक्टर होईल, दया पवार सारखा उत्कृष्ट लेखक समाज सुधारक होईल याचे सर्व श्रेय कमलाचे वडील बोंडे यांना जाईल.

सदानंद देशमुख यांच्या बारोमास कादंबरी वाचताना शेवट मात्र अतिशय दुःखद झाला होता. तसा या कथेमध्ये शेवट चांगला दाखवला आहे. किमान मुलगा शिकल्यानंतर  पारुला चांगले दिवस येतील अशी आशा पल्लवीत होते.
शेवटी मी एवढेच म्हणेल “सरपान किती वाकडे तिकडे असले तरी ते चुलीत सरळ जळते” त्याचप्रमाणे  पारुने तिन्ही चुलीवर संसार करत असताना येणाऱ्या वाकड्यातिकड्या अडचणींना सरपानाप्रमाणे सरळ चुलीत जाळून त्यावर मात करून विजय मिळवला आहे.

लेखक देवा झिंजाड यांनी अतिशय सखोल अभ्यास करून एक आगळीवेगळी कादंबरी निर्माण केली. अतिशय बोली भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने संवाद व्यक्त केलेले आहेत. कथेतील व्यक्तींची नावे त्या काळामध्ये शोभणारी दिली आहेत. एकंदरीत या कथेमध्ये फक्त मला गावांमध्ये क्रिकेटच्या मॅच भरवल्या जायच्या हे मात्र विसंगत वाटते कारण त्या काळामध्ये सूर फाट्या ,कबड्डी कुस्त्यांचे फड अशा स्पर्धा गावात भरवल्या जात असत पुढील लिखाणासाठी देवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुस्तकांसाठी संपर्क 9890697098

✍️प्रा.धनंजय पन्हाळकर, नेरले तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, ९४२३३०३७६८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!