एक वाढदिवस सहवेदनेचा! -

एक वाढदिवस सहवेदनेचा!

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.9:यंदाच्या वर्षी पावसाने महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातले. नद्या उफाळल्या, शेतं पाण्याखाली गेली, आणि अनेक शेतकऱ्यांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला. गावोगावी हळहळ व्यक्त होत होती. पण या दु:खाच्या क्षणी काहीतरी वेगळं, मनाला स्पर्शून जाणारं घडलं — आणि ते घडलं एका लहानशा बालमनात!

अहिल्यानगर येथील कु. विरश्री योगिता अभिजीत डूक्रे — इयत्ता पाचवीत शिकणारी ही मुलगी — हिचा आज वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे फुगे, केक आणि भेटवस्तूंनी साजरा करण्याऐवजी, तिनं ठरवलं — “या वर्षी माझा वाढदिवस पूरग्रस्तांसाठी!”


आई-वडिलांसमोर तिनं हा हट्ट धरला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. इतक्या लहान वयात आलेला हा सहवेदनेचा विचार पाहून तिची बहीण स्वराली (इ. ८ वी), आजोबा भागवत आणि आजी कांताबाई यांनी तिचं कौतुक करत तिला प्रोत्साहन दिलं.

यानंतर विरश्रीच्या आजोबा-आजींच्या (हनुमान टाकळी, ता. पाथर्डी) माध्यमातून गावातील पूरग्रस्त कुटुंबांना साखर वाटप करण्याचा निर्णय घेतला गेला. आजोबा व्ही. आर. गायकवाड आणि आजी सौ.आशाबाई यांनी लगेच पुढाकार घेत एक पोते साखर आणली आणि ती ११ कुटुंबांपर्यंत स्वतः घरपोच दिली.

पूरग्रस्तांनी या आगळ्या वाढदिवसाचे मनःपूर्वक आभार मानले आणि लहानशा  विरश्रीला भरभरून आशीर्वाद दिले. विरश्री  परिक्षेमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही, पण तिचं प्रेम, तिची सहवेदना मात्र या कुटुंबापर्यंत पोचली.

या उपक्रमात विरश्रीचे मामा – योगेश, विठ्ठल, मुकुंद, शिरीष तसेच मामी – माधुरी, अश्विनी, आरती आणि स्वराज, प्रणव यांनी मनापासून परिश्रम घेतले. या कार्याची प्रेरणा अमोल बांदल यांच्यापासून मिळाली.

लहानपणापासूनच विरश्रीचे मन संवेदनशील आहे. करमाळ्यातील अंगणवाडीत असतानाच तिनं “प्रदूषणमुक्त दिवाळी” साजरी करण्याचा उपक्रम राबवला होता. आज तिच्या “सहवेदनेच्या वाढदिवसा”तून त्या संवेदनशीलतेला खरी झळाळी मिळाली आहे.

अशा या चिमुकल्या हृदयात दडलेली मोठी भावना – ‘दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं’ – आपल्याला शिकवते की, माणुसकीचा खरा अर्थ वयावर नाही, तर मनाच्या विशालतेवर अवलंबून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!