तिसरं माहेर…

प्रत्येक मुलीसाठी तिचं पहिलं माहेर म्हणजे आई-वडिलांचं घर. तिथूनच ती प्रेम, जिव्हाळा आणि आधार घेऊन उभी रहाते. सक्षम होते मग लग्न करून सासरी जाते. लग्नानंतर काही मुलींना सासरही दुसरं माहेर मिळतं. तीथ ती सुन न रहाता, तीला लेकीसारखी जपली जाते. मला ही दोन्ही माहेर लाभले. पण माझं भाग्य इथंच थांबलं नाही…तर मला तिसरंही माहेर मिळालं आहे…
संतोष महाडीक हे माझे पती शिक्षक आहेत. आमच्या लग्नावेळी ते चापडगाव, ता.कर्जत, जि. अहिल्यानगर येथे शिक्षक होते. लग्नानंतर आम्ही करमाळ्यात राहायला आलो.
कृष्णाजीनगर मध्ये घर भाड्याने घेतले. घरमालक शेजारी असतील तर नेहमीच कुरकुर असते. असे मी ऐकून होते. पाणी वापरलं, बल्ब लावला,पंखा लावला तरी कुरकुर करणारे मालक असतात.मालकाच्या दृष्टीने भाडेकरू म्हणजे पैसे देऊनही गुलाम असतात.असं ऐकलं होतं.माझे माहेर म्हणजे खातगाव येथील रणसिंग परिवार. आम्ही सर्व एकत्र असल्याने घर कायम गजबजलेले. वडील राजेंद्र रणसिंग हे सोलापूर जिल्हा बँकेत अधिकारी होते. सुरवातीच्यावेळी मी लहान असताना करमाळ्यात भाड्याच्या घरात रहात होतो. पण त्यावेळी फारसा अनुभव नव्हता.आता मी प्रथमच भाड्याच्या घरात रहाणार होते. कसे असतील घर मालक,मालकीण ? हा प्रश्न होता.
आम्ही कृष्णाजीनगर येथील फंड परिवारातील घरात प्रथम भाडेकरू म्हणून आलो पण नंतर हे घर भाड्याचे नव्हे तर माहेर आहे याची प्रचिती बाळासाहेब फंड सर (काका)आणि मिनाकाकू यांनी दिली.
सर आणि काकू कधी घरमालक झालेच नाहीत, उलट आई-वडिला पेक्षा जास्त माया त्यांनी लावली. सकाळी उठल्यापासून सायंकाळपर्यंत काय हावं, काय नको, पहाणं, स्वयंपाकाला भाजी कोणती केली, हे कर, इकडची भाजी ने, माझ्या मुलाला इथीराज ला आज्जी आजोबाचे प्रेम दिले. घरात केलेली प्रत्येक गोष्ट आगोदर आम्हाला व नंतर त्यांना असते. आमच्यात कोणीही अजारी पडो, त्यावर धावपळ उडायची ती फंड परिवाराची..
कुठेही गेले की, इथीराज साठी काहीना काही येतेच. आई ची व बाबा ची आठवण येणार नाही असा जिव्हाळा. एक नाही दोन नाही तब्बल दहा वर्षे दिला. सरांची मुले मयुर व भुषण म्हणजे माझे भाऊ विश्वास तात्या,निवास दादा आणि छोटू दादा चा दुसरा रोल आहेत. इथीराज मयुर मामाकडेच खुप रमतो.
दहा वर्षे या घरात राहिलो… आणि आता बदलीमुळे इंदापूरला जायची वेळ आली आहे.याकाळात माझी आई सौ. सिंधू ही खुप कमी वेळा आली पण तीची उनीव काकूंनी कधीच जाणवू दिली नाही. माझे दोन्ही माहेरचे लोक कार्यव्यस्ततेमुळे कमी आले म्हणण्यापेक्षा दिदी तिसऱ्या माहेरात आहे. तीची कळजी करण्याची गरज नाही म्हणून कमी आले. माझे पती शाळेला गेल्यानंतर घरातील छोट्यामोठ्या कामात मदत व मार्गदर्शन काकूने केल्यामुळे मला दहा वर्षात एकही प्रश्न पडला नव्हता. आता पुढे काय हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे.
घर बदलणं सोप्पं असतं. पण “माणसं” मागे सोडणं फार कठीण असतं. या घराच्या भिंतींशी माझी फक्त आठवण नाही, तर भावनांची घट्ट विणलेली नाळ जोडली आहे. आज मी परमेश्वराला एकच मागते देवा माझं तिसरं माहेर असच हासत खेळत, आनंदी ठेव, या माहेरचा दरवाजा माझ्यासाठी कायम उघडा ठेव. फंड काका आणि फंड काकू, तुमच्या रुपाने मिळालेले आई-वडील, मयुर व भुषण सारखे भाऊ आणि तुमच्या कृपार्शीवादाने मिळालेलं माझ्या आयुष्यातलं तिसरं माहेर आणि हा स्नेह आयुष्यभर सोबत राहील रहावा हीच परमेश्वराकडे प्रार्थना…
✍️सौ. नुतन संतोष महाडीक (देशमुख)-रणसिंग मो.नं.9373633018
