व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी -

व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी

0

शेतकरी म्हटले की त्याला कोणीही जगू देत नाही. भले तो व्यापारी असो, वाहनधारक असो किंवा पोलीस प्रशासन असो – कोणीही त्याला सोडत नाही. शेतकरी आपला रात्रंदिवस कष्ट करून पोटच्या मुलाप्रमाणे जोपासलेल्या पिकाला किंवा धान्याला बाजारात घेऊन जात असतो. त्यावेळी त्रास सुरू होतो तो पोलीस प्रशासनापासून. शहराच्या बाहेर पोलीस थांबलेले असतात. ते गाडी अडवून त्रुटी दाखवतात – “गाडीचे पासिंग एवढे आहे”, “या गाडीत ओव्हरलोड माल आहे”, “तुम्हाला एवढा दंड भरावा लागेल.” अशा प्रकारे दंडाच्या नावाखाली वाहनचालकाला त्रस्त करून सोडले जाते.

शेवटी त्या वाहनातच शेतकरी देखील प्रवास करत असतो. अशावेळी वाहनचालक शेतकऱ्यालाच म्हणतो, “दादा, हा दंड भरला पाहिजे, अन्यथा माझ्या गाडीवर कारवाई होईल.” परिणामी चालक हा दंडाची रक्कम शेतकऱ्याकडून घेतो. हा झाला पहिला झटका.

यानंतर शेतकरी आपला माल घेऊन मार्केटमध्ये जातो. मात्र तिथेही व्यापारी त्याच्यावर अन्याय करतो. “माल असाच आहे”, “मालात हवाचं आहे” असे सांगून सोन्यासारख्या मालाची मातीमोल किंमत करून व्यापारी माल खरेदी करतो. हा दुसरा झटका.

तिसऱ्या टप्प्यात, फळबाग शेतकरी – विशेषतः केळी उत्पादक – आपला माल एखाद्या व्यापाऱ्याला विकतो. पण येथेही फसवणूक होते. त्या व्यापाराकडे मालवाहतूक करणारे वाहनचालक असतात. व्यापारी त्यांच्या संगनमताने रिकाम्या वाहनाचे वजन जास्त दाखवतो. उदाहरणार्थ, वाहनाचे खरे रिकामे वजन 2100 किलो असूनही ते 2400 किलो असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्याच्या सुमारे 300 किलो मालाचा तोटा होतो.

शेतकरी राजा हा स्वभावतः विश्वास ठेवणारा आणि सरळमार्गी असतो. त्याच्या या विश्वासाचा गैरफायदा व्यापारी घेतात. अशा प्रकारचे प्रकार सोलापूर जिल्ह्यासह करमाळा तालुक्यातील कंदर, जेऊर, टेंभुर्णी या भागांतील केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत घडत आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेत वाहनचालकाचा फारसा काही दोष नसतो. कारण जर वाहनचालकाने खरे वजन शेतकऱ्याला सांगितले, तर व्यापारी त्याच्या गाडीला पुन्हा माल मिळू देत नाही. मुळातच बाजारपेठेत मंदी, वाढते गाड्यांचे प्रमाण, डिझेलच्या वाढत्या किंमती, यामुळे वाहनचालकही गप्प बसतात.

अशा प्रकारचे व्यवहार सर्रास घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणावरही अंधविश्वास न ठेवता स्वतः रिकाम्या वाहनाचे वजन करताना उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. अन्यथा “व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी” अशी स्थिती निर्माण होते. याला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणे ही काळाची गरज आहे.

शे–शेवटपर्यंत कष्ट करून
–तब्येतीचा विचार न करता
–कष्ट करणाऱ्याचा
री–रिकामा खिसा
ही वस्तुस्थिती आहे शेतकऱ्याची

✍️ अतुल खूपसे पाटील

(लेखक जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)
अतुल खूपसे-पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!