वळूनी पाहिलं – अनुभव, संघर्ष, आणि इतिहासाचे जिवंत चित्रण

“वळूनी पाहिलं” हे आत्मचरित्र केवळ सर्जेराव देवराव विधाते सरांचे जीवनकथन नाही, तर ते एका काळाचा, संस्कृतीचा, माणुसकीचा आणि शिक्षणाच्या वाटचालीचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे.
महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक असलेले विधाते सर हे नाव आपल्याला परिचित असले तरी, त्यांनी जगलेले जीवन किती समृद्ध, संघर्षशील आणि प्रेरणादायी होते, याची प्रचिती हे पुस्तक वाचताना येते.
या पुस्तकात केवळ आठवणी नाहीत, तर इतिहास बोलतो. लिंबागणेशपासून आगळगाव, अरणगाव, बार्शी ते करमाळा – या प्रवासात त्यांच्या कुटुंबाची झालेली सामाजिक आणि आर्थिक घडामोडी वाचताना, एखाद्या चित्रपटासारखी दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यांच्या पूर्वजांनी खंडू माळी पैलवान यांना रावरंभा निंबाळकराकडून मिळवलेली जमीन, कुस्तीची परंपरा, त्यानंतर शेतातील नवीन प्रयोग, विहिरी, इंजिनांवर चालणाऱ्या गिरण्या –त्यांच्या कडे जुने रस्टन इंजिन होते. त्यावर पाणी काढणे, शेंगा फोडणे, तेल काढणे, पीठाच्या गिरणी एक नव्हेतर चार-चार गिरण्या होत्या. हे सर्व त्या काळच्या ग्रामीण समृद्धीचे प्रतीक ठरते .
पुस्तकातील सर्जेराव विधाते सरांचे शिक्षणप्रवास म्हणजे चिकाटी, जिद्द आणि नियतीवर मात करण्याची कथा. रमजानसारख्या मित्रांपासून ते जगदाळे मामांच्या सहृदयी शिक्षण प्रेमीची ओळख आहे. बार्शीतील शिक्षण संस्था, आणि पुणे ते सोलापूर – या वाटचालीत एक शिक्षक म्हणून त्यांनी घेतलेला संघर्ष वाचकाला प्रेरित करतो.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे – त्यांच्या विवाहाची कथा. प्रतिभाताईंचा एक हात व एक पाय नसतानाही, त्यांनी त्यांना ज्या आदराने स्वीकारलं, त्यांच्या सासरच्यांनी जे संस्कार दिले आणि मुलांना जो धीरगंभीर, प्रेमळ आणि शिक्षणप्रधान वारसा दिला, तो अत्यंत भावस्पर्शी आहे.मुले डॉ. दिपक, ज्योतिबा, मुलगी कमलादेवी यांची वाटचाल तसेच आई चंद्रभागा यांनी केलेले कष्ट, लेकरांच्या भविष्यासाठी मोडलेली भांडी, वडील देवराव विधाते यांचे शेतातील कष्ट, वडिलांबरोबर झालेल्या संघर्षाने वाद न घालता, वाटणी न मागता, लोकांची शेती करणे, सायकलवर बर्फाचे गोळे विकणे, कँन्टीन चालवणे, वाॅचमन म्हणून काम करणे असा आयुष्यभर केलेला संघर्ष पहावयास मिळतो. अलीकडील पिढी नातवंडे रुचा,समर्थ, आदित्य, वेदीका,संस्कृती यांची ओळख दिली तसेच जीवनात चारवेळा जीवदान कसे मिळाले हे सुध्दा मांडले आहे.
विधाते सरांनी आपल्या आत्मचरित्रात केवळ स्वतःचा इतिहासच नाही, तर करमाळा, बार्शी आणि परिसरातील अनेक मान्यवरांचा, शिक्षकांचा, शाळांचा आणि विद्यार्थ्यांचा अमूल्य दस्तऐवज जपला आहे. ना.बा. परदेशी, प्रा. आर. आर. मोरे, जी. एस. भोसले, चित्रकार संदेश खुळे आदी सारख्या व्यक्तींवर केलेले लेखन त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि आठवणी जपण्याच्या वृत्तीचा दाखला देते.पुस्तकाच्या अखेरीस दिलेली विधाते व्यक्तींची वंशावळ हे केवळ कौटुंबिक विवरण नसून, एका घराण्याच्या सामाजिक विकासाचा आरसा आहे. उद्योजक राजेंद्र काळे यांच्यावरील लेखन हे ‘जिद्द असेल तर मार्ग नक्की सापडतो’ याचे उदाहरण ठरते.
हो, काही प्रमाणात शुद्धलेखनाच्या चुका, पुनरावृत्ती दिसतात; पण त्या या प्रामाणिक लेखनाच्या सच्चेपणाला आणि त्याच्या आत्मीय कथेला बाधा आणत नाहीत.
“वळूनी पाहिलं” हे पुस्तक केवळ वाचण्यासाठी नाही, तर जपून ठेवण्यासाठी आहे.
हे एका शिक्षकाचे आत्मचरित्र असले, तरी ते शिक्षकांपुरते मर्यादित राहत नाही – तर समाजशास्त्र, शिक्षण, ग्रामीण संस्कृती, कुटुंबव्यवस्था, संघर्ष आणि मूल्ये यांची समृद्ध कहाणी होते.
सर्जेराव विधाते सरांचे मनःपूर्वक अभिनंदन – की त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरीनंतर इतक्या ताकदीने, सच्चेपणाने आणि आत्मीयतेने आपले आयुष्य शब्दबद्ध केले. हे पुस्तक भविष्यासाठी प्रेरणास्रोत ठरेल, यात शंका नाही.
शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, साहित्यप्रेमी – सर्वांसाठी हे पुस्तक एक प्रेरणास्त्रोत आहे.
✍️डाॅ.ॲड. बाबूराव हिरडे, करमाळा, मो.नं. 9423337480
