केमचे ऊत्तरेश्वर देवस्थान जागृत स्वयंभू शिवलिंग
केम/ संजय जाधव
करमाळा तालुक्यातील केम येथे श्री उत्तरेश्वर बाबांचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. या गावात जागृत ग्रामदैवत शिवलिंग असलेले उत्तरेश्वर देवस्थान आहे. या गावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कुंकू हे सौभाग्याचे लेणे या गावात तयार होते. या गावची यात्रा फाल्गुन शुद्ध द्वितीय व तृतीया या काळात भरते. तसेच श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
या देवस्थानची आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे. पूर्वी उज्जैनीचा चंद्र शेम नावाचा राजा होता तो दानशूर धार्मिक राजा म्हणून परिचित होता या राजाला संतती नसल्याने तो मनोमन नाराज होत असे पुढे कालांतराने त्यास एक पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचा नामकरण विधी करण्यात आला त्या राजपुत्राचे नाव क्षेम हे ठेवण्यात आले. राजकुमार क्षेम हा कुशाग्र बुद्धीचा होता तो सर्व क्षेत्रात निपुण होता कर्तुत्ववान पराक्रमी होता त्याचप्रमाणे सौंदर्याने रूपवान होता. त्या राजपुत्रास चक्रवर्ती राजाच्या कन्येने पाहिले व त्याच्या रूपावर ती भाळली तिला केव्हा तो राजपुत्र भेटेल असे झाले व केव्हा दृष्टा दृष्ट होईल असे वाटले इकडे क्षेम राजा आनंदाने राज्य करीत होता. चक्रवर्ती राजाने क्षेम राजाला स्वतःच्या नगरात बोलावले तेव्हा क्षेम राजा चक्रवर्ती राजाच्या नगरात गेला क्षेमराजाचे त्यानिमित्त हत्ती हर्षाने स्वागत करण्यात आले.
काही कालांतराने त्या राजकन्येचे व क्षेम राजाचे लग्न झाले तो लग्न सोहळा चार दिवस चालला होता राजमहालात रोषणाईने महाल सजवला क्षेम राजा राजमहालात निघाला तेवढ्यात क्षेम राजावर देवाने घाला घातला. त्याच्या संपूर्ण शरीराची दुर्गंधी सुटली सर्व शरीरातून रक्त पू वाहू लागले. वैभव शृंगार फुलांची शय्या जागेवर सुकून गेली.
एके दिवशी उज्जैनहून पांथस्थ आले ते त्रिकालदसी होते ते ज्योतिष शास्त्र जाणत होते क्षेम राजाने त्यांना पत्नीसह साष्टांग दंडवत घातला व घडला प्रकार सांगण्यास सुरुवात केली दिवसा शरीर उत्तम असते पण रात्री दुर्गंधी सुटते असा प्रकार ऐकल्यानंतर त्या साधूने डोळे मिटले व अंतर्ज्ञानाने उत्तर दिले तू मागील जन्मी एका सावकाराचा पुत्र होता संपूर्ण गावची सूत्रे तुझ्या हातात होती त्याच नगरात एक गरीब माणूस राहत होता लोकांच्या आश्रयावरून त्याची उपजीविका चाले.
त्याची पत्नी सुंदर होती तू त्या स्त्रिला घरी बोलावून तुझ्या मनाची इच्छा पूर्ण केली तिला धनाचे आमिष दाखवले तिने स्वगृही जाऊन घडला प्रकार सांगितला तेव्हा त्या पांथस्ताने शाप दिला की तुझा जन्म राजवंशात होईल राजकुमार होशील ज्या दिवशी तुझा राणीशी संभोग असेल त्या दिवशी तुला रक्तपिती होईल असे त्या साधूने क्षेम राजाला सांगितले त्यानंतर त्या साधूने क्षेम राजाला एक उपाय सांगितला की तुम्ही दोघे उज्जैन नगरी सोडून दक्षिणेकडे जा दर कोस दर मुक्काम करीत एक कुंड लागेल. त्या कुंडातील अद्भुत प्रचिती तुला येईल साक्षात शंकराने क्षेम राजाला सांगितले ते कुंड ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सात लिंगाचे दर्शन होईल व त्या कुंडात तू ज्या दिवशी स्नान करशील त्याच दिवशी तू शाप मुक्त होशील असे त्या साधूने सांगितले. त्याप्रमाणे चालतच करमाळा येथील कमला भवानी मंदिरात दर कोस मुक्काम करीत राजा आपल्या पत्नीसह पोहोचला सकाळी नेहमीप्रमाणे चालत माळवाडी ( मलवडी ) येथे पोहोचला तिथे रात्री त्यांनी मुक्काम केला. पहाटे त्याला माळवाडीच्या दक्षिणेकडे क्षेम म्हणजे केम नगरीत एक झरा दिसला रात्र झाल्याने त्याने तो झरा हाताने स्पर्श केला व तो पाणी प्यायला तोपर्यंत एक चमत्कार घडला राजाची व्याधी नष्ट झाली राजाला आनंद झाला त्याने सेवकाला बोलवून तो झरा उकरून काढला त्यांनी त्या कुंडात स्नान केल्याने तो शापमुक्त झाला राजाच्या सेवकाने तो झरा उकरून काढला त्यामध्ये सात लिंग सापडली. त्या नगराला राजाने क्षेम नगरी असे नाव दिले हे सात लिंग म्हणजे केम गावचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराजांचे भाऊ मलवडी येथील रामेश्वर… विझोरा येथील महादेव घुटकेश्वर…पठारावरील महादेव शंकरेश्वर…मदनैश्वर…केमेश्वर…दक्षिणेश्वर… बसमेश्वर अशी ही सात लिंग स्थापन झाली आहेत हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.