वनमाला काकी: संस्कारांची शाळा आणि सेवाभावाची परंपरा

जिथे जिथे वनमाला (काकी) यांचं नाव घेतलं जातं, तिथे तिथे मायेचं, प्रेमाचं आणि दयाळूपणाची वात्सल्यपूर्ण मूर्ती उभी राहते, “जिथे माया आहे तिथे देव आहे” या उक्तीप्रमाणे काकींच्या जीवनकार्याने मानवतेला नवा अर्थ दिला आहे. त्यांच्या त्यागी जीवनाचा आणि प्रेमळ व्यक्तिमत्वाचा आदर्श आमच्या साठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे.
वनमाला काकी यांचा जन्म 8 जुलै 1971 रोजी धनेगाव या गावी झाला, लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे जीवनाची सुरुवातच कठीण वळणावर उभी राहिली होती; पण त्या वयातच आजीच्या मायेने, आधाराने आणि संस्कारांनी त्या उभ्या राहिल्या, घडल्या आणि नंतर संपूर्ण आयुष्य प्रेम, समजूतदारपणा आणि सेवाभावाने उजळवलं. आजीने दिलेला त्याग, संवेदनशीलता आणि करुणा काकींच्या स्वभावात रुजली आणि आयुष्यभर त्यांच्या वागण्यातून तीच उब उमटत राहिली. आज्जी, मावशी, आणि मामांनी त्यांना खूप प्रेमानं वाढवलं, शिकवलं आणि त्यांचा विवाह …रोजी भोसे गावातील भोजराज सुरवसे यांच्याशी झाला. भोजराज सुरवसे यांच्याशी लग्न झालं त्यावेळी त्यांचे एकत्र कुटुंब होतं, भोजराज सुरवसे यांच्याशी विवाहबद्ध होताच काकींनी एकत्र कुटुंब पद्धतीची मौल्यवान परंपरा मनापासून स्वीकारली. तीन दिर—एक मोठे आणि दोन लहान—असे मोठे कुटुंब असतानाही काकींनी प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या सावलीत समान सन्मानाने जपले. मोठी जाऊ असो वा लहान जाऊ, त्या दोघींनाही त्या खऱ्या बहिणीप्रमाणेच आपुलकी, सल्ला, माया आणि आधार देत राहिल्या.

काकींनी संसार उभा करण्यासाठी ज्या जिद्दीने, शांतीने आणि मौन सामर्थ्याने भोजराज (बापू) सुरवसे यांचा हातात हात धरून साथ दिली, ती त्यांच्या जीवनातील सर्वात मोलाची ओळख राहिली. नात्यांची गाठ घट्ट विणणारी, घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या मायेच्या कक्षेत सुरक्षित ठेवणारी, आणि अडचणीच्या क्षणी खंबीरपणे उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी वनमाला काकी होती.
भोसे गावात मायेचा, प्रेमाचा आणि दयाळूपणाचा ज्योत प्रकाशित करून जगलेल्या वनमाला काकींच्या आठवणी आज मनाला खोलवर स्पर्शून जातात. काकींचं व्यक्तिमत्त्व म्हणजे सौम्यता, करुणा, समजूतदारपणा आणि प्रत्येकाला आपलंसं करून घेण्याची विलक्षण शक्ति. त्यांच्या डोळ्यातील मृदू तेज आणि बोलण्यातून डोकावणारी प्रेमळ ताकद गावातील प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून गेली.
त्या गावातील सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने मायच होत्या. कोणाला दुःख, अडचण असेल तर सर्वात आधी मदतीचा हात फक्त काकींचाच असायचा. लोकांचं अडचणी ऐकण्याची आणि त्यांना आधार देण्याची त्यांची वृत्ती त्यांना सर्वांच्या अगदी जवळ घेऊन जायची. दारात आलेला कोणत्याही जातीधर्माचा व्यक्ती असू द्या काकी किमान चहा पाजल्याशिवाय परत पाठवत नसायच्या. कमी वेळात काकांबरोबर आलेल्या जास्तीत जास्त लोकांचा कमीत कमी वेळात चवदार स्वयंपाक करण्याची कला फक्त काकींकडेच होती. सर्वधर्म समभाव हा राज्यघटनेचा मूलभूत विचार आम्हाला काकींच्या कृतीतून समजून आला.
गावात जर कधी कुणाचे आपापसांत भांडण-तंटे झाले, तर लोकांनी थेट भोजराज बापूंकडे न जाता प्रथम काकींनाच भेटायचं. कारण सगळ्यांच्या मनात एक न बोलता समजलेली भावना होती—बापू थोडे रागीट स्वभावाचे, काटेकोर माणूस; पण काकी मात्र शांत, समजूतदार, मायेने ऐकून घेणाऱ्या होत्या.
लोकांना खात्री होती की काकी आधी मन मोकळं करून घेतील, दोन्ही बाजू समजून घेतील आणि मग योग्य त्या शब्दांत, योग्य त्या शांततेने बापूंना समजावून सांगतील. त्यांचा तो मृदू स्वभाव, ऐकून घेण्याची तयारी आणि मदत करण्याची क्षमता यामुळेच गावकऱ्यांना त्यांच्यावर अपार विश्वास होता. म्हणूनच कोणताही वाद असला, छोटीशी कुरबूर असली तरी पहिले नाव आठवायचे ते काकींचं—कारण तिथे प्रेम होतं, समजूत होती आणि दोघांना जवळ आणण्याचा जीव लावणारा प्रयत्नही.

समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात काकींचा सहभाग निस्वार्थी आणि अचानक होता. भोसे गावच्या सरपंचपदी महिला आरक्षण पडल्याने त्या राजकारणात आल्या त्याआधी त्यांचे पती म्हणजे भोजराज (बापू) सुरवसे हे गावातील ग्रामपंचायत मध्ये दोन वेळा सरपंच पदी निवडून आले होते, काकींची सरपंच पदी निवड होणे हा लोकांचा त्यांच्यावरील विश्वासाचा सर्वोच्च पुरावा होता. सरपंच म्हणून त्यांनी अनेक विकासकामे केली—रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा, गरीबांसाठी मदत, महिलांसाठी प्रोत्साहन उपक्रम अशा असंख्य उपक्रमांत त्यांची छाप उमटली. त्यांनी गावासाठी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून गावाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळवुन दिला.
काकींच्या आयुष्याचा सर्वात सुंदर आणि तेजस्वी पैलू म्हणजे त्यांची अखंड आध्यात्मिकता. देवाविषयीचा त्यांचा श्रद्धेचा भाव इतका निर्मळ आणि मनापासूनचा होता की जणू भक्तीच त्यांचा श्वास बनली होती. घरातील देवघर असो किंवा गावातील कोणतेही धार्मिक स्थान, काकींच्या पावलांनी तेथील वातावरणात नेहमीच शांतता आणि पवित्रता पसरत असे.
धार्मिक कार्यक्रम, सण-उत्सव, देवी-देवतांच्या पूजा—यामध्ये काकी नेहमी सढळ हाताने, मनोभावे मदत करायच्या. त्यांची देणगी ही केवळ आर्थिक नसायची; ती प्रेमाची, वेळेची, श्रमांची आणि अखंड भक्तीची असायची. एखाद्याने मदत मागावी किंवा न मागावी—काकींना देवकार्य दिसले की ते त्यांची जबाबदारीच मानायच्या.
सुरवसे परिवाराने बांधलेल्या महालक्ष्मी मंदिराशी तर काकींचा अतूट आणि जीवाभावाचा संबंध होता. मंदिराची दररोज स्वच्छता, नित्य नैवेद्य, दीपज्योत, फुलांची सजावट, देवीची आरती—हे सर्व त्या जणू आपल्या घरातील देवीसारखेच मनापासून करत असत. पावसाळा असो, कडक उन्हाळा असो किंवा थंडी—काकी कधीही आपल्या सेवेपासून दूर राहिल्या नाहीत.
त्यांच्या हाताने केलेली पूजा म्हणजे भक्तीचा स्पर्श, आणि त्यांच्या उपस्थितीने मंदिरातील वातावरण दिव्य आणि प्रसन्न व्हायचे.
काकींच्या आध्यात्मिक स्वभावामुळे संपूर्ण कुटुंबात श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि सकारात्मकतेचे वातावरण राहिले. देवभक्तीमध्ये आणि सेवेमध्येच जीवनाचे खरे समाधान मिळते—हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून प्रत्येकाला शिकवला. त्यांच्या भक्तीची उब, त्यांच्या मनाची पावित्रा आणि त्यांच्या कर्मांची उजळणी आजही त्या मंदिरात आणि कुटुंबाच्या मनात जिवंत आहे.
काकी म्हणजे भक्तीची मूर्ती, श्रद्धेची ज्योत आणि सेवाभावाची आनंदमयी प्रतिमा—अशी त्यांची ओळख कायम स्मरणात राहील. काकींच्या जीवनातील सर्वात महान ओळ म्हणजे त्यांनी घडवलेले परिपूर्ण आणि सुशिक्षित कुटुंब. त्या केवळ गृहिणी नव्हत्या; त्या संस्कारांची शाळा होत्या, प्रेमाची माऊली होत्या आणि प्रत्येकाला योग्य वाट दाखवणाऱ्या मार्गदर्शक होत्या.
घरातील पुतण्या–पुतणी, स्वतःच्या चार मुली, आणि एक मुलगा—या सर्वांवर काकींनी लहानपणापासून संस्कारांची शिदोरी ठेवली. कुटुंबातील प्रत्येक मूल त्यांच्या प्रेमाने, शिस्तीने आणि मायेने घडत गेले. त्यांच्या हातातील संस्कारांचा प्रकाश इतका प्रभावी होता की या घरातील प्रत्येक मूल आज स्वतःच्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठताना दिसते.
काकींनी घडवलेल्या कुटुंबातील यशोगाथा अभिमानाने सांगावी अशीच आहे, त्यापैकी एक पुतण्या काकींनी प्राध्यापक केला, दुसरा पुतण्या इंजिनिअर झाला, तर तिसरा डॉक्टर पदवीचा अभ्यास करत आहे, स्वतःचा मुलगा यशस्वी व्यावसायिक बनला,
आणि चारही मुली आणि तीन पुतण्या आशा एकूण सात मुलींचा विवाह उत्तम, सुशिक्षित आणि मोठ्या घरात केला—प्रत्येक मुलीने आपल्या घराला गौरव मिळवून दिला. जावयांबाबत बोलायचे झाले तर काकींचे दूरदृष्टीचे दृष्टीकोन स्पष्ट दिसून येतो—स्वतःची मुलगी म्हणूनच नाही तर सर्व पुतणी मुली सुद्धा खूप श्रीमंत आणि संस्कारी घरात दिल्या.

घरातील पहिली मुलगी म्हणजे काकींची पुतणी स्वाती रामचंद्र घागरे हे जावई पुणे येथे नामांकित वकील आहेत. दुसरी मुलगी ज्योती राहुल सावंत हे जावई करमाळा शहरातील नामांकित वकील व पंचायत समिती सदस्य , व हमाल पंचायत समितीचे अध्यक्ष आहेत. तिसरी मुलगी मोहर प्रशांत तापकीर या घरी दिली हे जावई सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. चौथी मुलगी त्रिशल कृष्णदेव हरगुडे पाटील घराण्यातील प्रसिद्ध बागायतदार तसेच यशस्वी व्यवसायिक आहेत, पाचवी मुलगी मोहिनी लहू काळे या परिवारात दिली हे जावई वडगाव येथील काळे परिवारातील सीए आहेत. घरातील सहावी ब दुसरी पुतणी कीर्ती संतोष राखुंडे हे करमाळा शहरातील असून हे जावई इंजिनिअर आहेत, घरातील सातवी मुलगी व तिसरी पुतणी प्रीती संतोष कदम हे जावई करमाळा शहरातील प्रसिद्ध व्यासायिक असून ते मराठा मंदिर ज्वेलर्स व कमलाई स्टील इंदुस्ट्रीज चे मालक आहेत. अशा प्रकारे स्वतःच्या चार मुली आणि तीन पुतण्या अतिशय नामांकित सुसंस्कारी घरात दिल्या आहेत.
काकींची सुना म्हणजे त्यांच्यासाठी परक्या घरची मुलगी नव्हे, तर स्वतःच्या लेकरांसारख्याच होत. जणू त्या दोन सुना नव्हे तर त्यांच्या हळव्या मनाच्या दोन मुलीच —ज्यांच्यावर काकी तितक्याच मायेने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने जीव लावत होत्या.
त्यांच्या प्रत्येक आनंदात काकींचा आनंद सामायिक व्हायचा, आणि त्यांच्या प्रत्येक काळजीवर काकींचा हात आश्वासकपणे पुढे यायचा.
इतके मोठे आणि बहुआयामी कुटुंब सांभाळताना काकींनी कधी तक्रार केली नाही. उलट, त्यांनी प्रत्येकाची मनोभावे सेवा केली—आजारी वेळ असो, सण-उत्सव असो, पाहुणचार असो किंवा जबाबदारीचे प्रसंग—‘हे काम फक्त काकीच करू शकतात’ असे घरातील प्रत्येकाच्या मनात खोलवर कोरले गेले. त्यांच्या हातात गोडवा, त्यांच्या शब्दात प्रेम, आणि त्यांच्या स्वभावात सेवाभावाचं शुद्ध दर्शन असे.
काकी म्हणजे कुटुंबाला एकत्र बांधणारी उबदार छत्रछाया—
ज्या हातांनी स्वयंपाक केला, त्याच हातांनी संस्कार रुजवले;
ज्या पावलांनी मंदिरात सेवा केली, त्याच पावलांनी घरातील सुखाची वाट घडवली; आणि ज्या मनाने भक्ती केली, त्याच मनाने कुटुंबाला घडवले.
आज कुटुंबातील प्रत्येक यशामध्ये काकींचा दिसणारा वाटा म्हणजे त्यांचे अमर योगदान. त्या स्वतः मागे राहून कुटुंबातील प्रत्येकाला पुढे नेणाऱ्या प्रकाशस्तंभासारख्या होत्या. पण काळाने अचानक असा घाव घातला कीदिनांक 20/12/2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने
काकी आपल्यातून निघून गेल्या… क्षणभरात सारं काही विरून गेल्यासारखं वाटलं. काकी, तुमचं असं अचानक जाणं… ही बातमी मनाला चिरत गेली. हृदयाच्या तळाशी खोलवर वेदना उमटली. घरातील प्रत्येक कोपरा आज पोकळ वाटतोय, आणि जिव्हाळ्याने विचारपूस करणारा, प्रेमाने हाक मारणारा तुमचा आवाज जणू हवेत विरून गेलेला वाटतोय. तुमच्या अनुपस्थितीने आयुष्याची एक पानंच जणू हरवले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते..
घराची ऊब म्हणजे माझी काकी,
गोड शब्दांनी मनाला शांत करणारी माया म्हणजे माझी काकी,
आणि हक्काने विचारपूस करणारी एक जिव्हाळ्याची सावली म्हणजे माझी काकी,लोखंडाचे सोन करणारा परीस म्हणजे माझी काकी, संयमी, निश्चयी, आणि समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणजे माझी काकी,
माझ्या घरापुरतंच नव्हे तर गावातील प्रत्येकासाठी आपुलकीची सावली म्हणजे माझी काकी,
काकी फक्त घरातील व्यक्ती नव्हती तर ती मायाळूपणाची मूर्ती, दयाळूपणाची सावली,
आणि सत्कर्मांची सुवासिक माळ होती माझी काकी.
काकी… तुमचं जाणं खूप तीव्र वेदनादायक, असह्य आणि मनाला वितळून टाकणारं आहे.लोकं म्हणतात,“जो आवडे सर्वाना… तो आवडे देवांना.” आज या म्हणीचा खरा अर्थ आम्हाला कळतोय.
तुम्ही सर्वांची काळजी घेतली, प्रेम दिलं, उब दिली, आधार दिला, आणि त्यासाठी कधी काही अपेक्षाच ठेवल्या नाहीत. म्हणूनच कदाचित देवालाही तुम्ही आवडलात…
भक्तीत रमलेलं, सेवेत आनंद मानणारं, मनाने निर्मळ, भावना शुद्ध असलेलं तुमचं आयुष्य देवाने आपल्या छायेखाली नेलं.
माणसाच्या आयुष्याचं मोजमाप वर्षाने होत नाही, ते होतं किती ह्रदयं आपण जिंकली याने.
आणि काकी—तुम्ही जिंकलेली मनं आज अश्रूंनी भरून तुमची आठवण करत आहेत.तुमच्या मायेची उब, आवाजातील गोडवा, प्रत्येकाला दिलेला सल्ला, आणि प्रत्येक नातं मनापासून निभावण्याची तुमची शैली—हे सगळं अजूनही इथंच आहे… वातावरणात, आठवणीत, आणि आमच्या श्वासातही. काकी, तुमच्या पवित्र आत्म्यास आमची अत्यंत भावपूर्ण, हृदयपूर्वक श्रद्धांजली.तुमच्या सुंदर स्मृती आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील.ओम शांती.
✍️प्रा.डॉ.दिपक कुंडलीक सुरवसे, मो.8087217999

