गेल्या १०० वर्षातील काळाच्या बदलाचा साक्षीदार!

मांजरगाव येथील ज्येष्ठ नागरिक नारायण धनाजी बागडे यांनी १ जानेवारी २०२६ रोजी आयुष्याची १०१ वर्षे पूर्ण करत शतायुषी जीवनात पदार्पण केले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंतचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक बदल त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेला असून त्यांचा जीवनप्रवास संघर्ष, कष्ट, संस्कार आणि मूल्यांनी समृद्ध असा प्रेरणादायी ठरला आहे.

त्यांचे चिरंजीव व सध्या भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत असलेले संतोष बागडे यांनी याविषयी माहिती देताना म्हणाले की, खरे पाहता त्यांच्या जन्माची अचूक नोंद त्या काळी उपलब्ध नव्हती. मात्र माझ्याकडे १९२९ सालचा एक ७/१२ उतारा आहे. तसेच त्यांची मोठी बहीण सोनी धन्याबा (धनाजी) बागडे हिचे निधन २८ ऑगस्ट १९३४ रोजी झाले होते. त्या प्रसंगाची त्यांना स्पष्ट आठवण असल्याचे ते सांगतात. या सर्व पुराव्यांवरून १ जानेवारी १९२५ ही जन्मतारीख निश्चितच सत्य आणि विश्वासार्ह ठरते. त्यामुळे त्यांच्या आधारकार्डवर देखील हीच जन्मतारीख लिहिली आहे.

लहान वयातच त्यांच्या वडिलांचे (धनाजी बागडे) यांचे निधन झाले. त्यानंतर चुलते महादू बागडे यांचेही निधन झाले. घरातील सर्व जबाबदारी अगदी कोवळ्या वयात त्यांच्या खांद्यावर आली. ते घरातील सर्वात मोठे असल्यामुळे तीन सख्खे भाऊ – किसन बागडे, विष्णू बागडे – तसेच तीन बहिणी यांचा सांभाळ त्यांनी केला. चुलतबंधू साधू बागडे व त्यांच्या बहिणी, तसेच भीमाबाई कांबळे, गिर्जाबाई वेताळ, हिराबाई, राहीबाई लोंडे, सकुबाई वाघमारे, मथुरा पाखरे, गीताबाई शिंदे असा मोठा परिवार त्यांच्या आधाराने उभा राहिला.
चुलत्यांच्या निधनानंतर आजोबा बंडू यमा बागडे यांनीही ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. बंडू बाबा हे मांजरगाव परिसरातील त्या काळातील मानाचे व प्रभावी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावावर सुमारे दीडशे ते दोनशे एकर जमीन होती. त्या जमिनींना चावूर, गुलाली, चिकणी, बराड अशी नावे होती.

दि. २३ जुलै १९६९ रोजी बंडूबाबांच्या निधनानंतर सर्वात मोठ्या नात्याने जमीन माझ्या वडिलांच्या नावे आली. त्यांनी मोठेपणाने आणि न्यायाने वाटणी केली. गुलाली नावाची जमीन नात्यातील व्यक्तींना दान देण्यात आली. उर्वरित जमीन सर्व भावंडांमध्ये समसमान वाटली. पाण्याखालील विहीर, बागायत आणि इतर सोयी सर्वांसाठी समान ठेवून त्यांनी न्यायप्रियतेचा आदर्श घालून दिला.
१९९५-९६ साली त्यांनी आपल्या चार मुलांमध्ये –
मारुती नारायण बागडे,
अरुण नारायण बागडे,
संतोष नारायण बागडे (Indian Army Subedar),
सतीश नारायण बागडे (स्वर्गवासी) –
तसेच चुलते व चुलतबंधू यांच्या नावे जमीन करून दिली. त्या वेळी गावात चर्चा होती की एवढ्या मोठ्या मालमत्तेवरून वाद होतील; पण वडील आणि चुलत भाऊ हनुमंत बागडे यांनी अत्यंत समजूतदारपणे व शांततेत वाटणी पूर्ण केली. तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांनी मोजणी करताना वाटणीतील अचूकता पाहून कौतुक व्यक्त केले.

मृत्यूच्या दारातून परत आलेले धैर्य!
एकदा चिखणी शिवारातून बैलजोडी घेऊन येताना ते जवळपास ३५–४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडले. त्यांच्या दोन्ही पायांना, पाठीच्या व मानेच्या मणक्यांना तसेच हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली. गावकऱ्यांनी कवाडाचा पाळणा करून त्यांना वर काढले. त्या अवस्थेतही ते म्हणाले, “मला काही झाले नाही, तुम्ही रडू नका.”
पश्चिम सोगावचे प्रसिद्ध मालिशतज्ज्ञ सरडे नाना यांनी त्यांच्यावर उपचार केले. अवघ्या आठवड्याभरात ते काठीच्या आधाराने चालू लागले. तीन-चार महिने नियमित उपचार घेत त्यांनी पूर्ण बरे होण्याचा चमत्कार घडवला. हे त्यांच्या अदम्य जिद्दीचे ज्वलंत उदाहरण आहे.
कष्टाळू शेतकरी
नारायण बागडे म्हणजे कष्टाचे प्रतीक. अखंड श्रम, मोठमोठी ओझी उचलणे आणि जिद्दीने काम करणे – ही त्यांची ओळख. त्यांची सिंहासारखी बुलंद आरोळी आजही गावातील ज्येष्ठ लोक आठवतात. हुंबेवस्तीतील पहिली ज्वारी मळणी यंत्र त्यांनी आणि त्यांच्या मित्र मारुती हुंबे यांनी घेतली होती.
दीर्घायुष्याचे रहस्य
आज १०१ व्या वर्षीही त्यांचे आरोग्य चांगले आहे.
त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे –
• साधा, सात्विक आहार (सकाळी भरपूर दूध)
• प्रचंड कष्ट करण्याची सवय
• शिस्तबद्ध व वक्तशीर जीवन
ते माळकरी आहेत. गळ्यात तुळशीमाळ, ओठांवर हरिनाम आणि मनात विठ्ठलभक्ती. दररोज हुंबेवस्तीतील हनुमान मंदिरात नियमित दर्शन घेतात. अंगणात फेरफटका व हलकी हालचाल करून ते शरीर तंदुरुस्त ठेवतात.
मोठा परिवार सोबत
त्यांना चार मुले व दोन मुली असा परिवार आहे.
संतोष बागडे भारतीय सैन्यात सुभेदार पदावर देशसेवा करीत आहेत.
मारुती व अरुण बागडे हे शेती व्यवसायात कार्यरत आहेत.
मुली ताराबाई व नर्मदा या सासरी त्यांच्या संसारात व्यस्त आहेत. नातवंडांमध्येही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य होत आहे. रोही व माऊली मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. महादेव राष्ट्रीय बँकेत अधिकारी आहेत. बिभीषण व्यवसाय क्षेत्रात आहे. अभिषेक व महेश शिक्षण घेत आहेत. ताई, रेश्मा, पायल व बाई यांचे विवाह झाले आहेत, तर रीतू, सोना व ईशू शिक्षण घेत आहेत. पुत्र सतीश यांच्या स्मृती कुटुंब जपून आहे.
माझ्या वडिलांचे जीवन म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कष्ट यांचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी नेहमी कुटुंब एकत्र ठेवले, मुलांना उत्तम संस्कार दिले आणि समाजात सन्मानाने जगण्याचा आदर्श घालून दिला. त्यांच्या शब्दांत संयम, विचारांत स्पष्टता आणि कृतीत प्रामाणिकपणा दिसून येतो. संकटे आली, अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. मेहनत, श्रद्धा आणि चिकाटी यांच्या बळावर त्यांनी आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार केला.
– संतोष बागडे, (मुलगा), सुभेदार, भारतीय सैन्य दल

