कुणालाही OTP न देताही खात्यातून ६४ हजार गायब – महिना उलटूनही दिव्यांग व्यक्ती न्यायाच्या प्रतीक्षेत

केम(संजय जाधव): केम येथील दिव्यांग व्यक्ती दत्तात्रय कुलकर्णी यांच्या बँक खात्यातून मोबाईल बँकिंगचा वापर करून तब्बल ६४ हजार रुपये अनधिकृतरीत्या काढून घेतल्याची धक्कादायक घटना २१ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली. विशेष म्हणजे OTP मागण्यासाठी कुणाचा फोनही आला नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करून जवळपास एक महिना उलटून गेला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने श्री.कुलकर्णी हवालदिल झाले आहेत.

दत्तात्रय कुलकर्णी यांचे केम मध्ये छोटेसे स्टेशनरी दुकान आहे. घडलेल्या घटनेबाबत माहिती देताना ते म्हणाले की माझे बँक ऑफ महाराष्ट्र, केम शाखेत खाते असून या खात्याशी संबंधित माझ्याकडे ATM नाही, फोन पे किंवा गुगल पे सारखे युपीआय पेमेंट ऍप देखील या खात्यासाठी मी वापरत नाही.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० च्या सुमारास मला अनेक OTP चे SMS मोबाईलवर प्राप्त झाले होते. यामध्ये फोनपे व मोबिक्विक या UPI पेमेंट अॅप्लिकेशनमध्ये लॉगिनसाठीचे 2 OTP , तसेच 1 OTP आधारकडून, महाराष्ट्र बँककडून डिव्हाईस लिंकिंग चे 1 OTP SMS मोबाईलवर प्राप्त झाले होते. एक संशयास्पद लिंक असलेला देखील एसएमएस आला होता. याचबरोबर मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून IMPS ट्रान्झॅक्शनसाठी लाभार्थी (बेनिफिशरी) समाविष्ट केल्याचा संदेशही मोबाईलवर आला. मात्र मी कोणालाही OTP दिला नव्हता तसेच OTP मागण्यासाठी कोणताही फोन कॉलही त्यांना आलेला नव्हता. तरीदेखील अवघ्या अर्ध्या तासाच्या आत IMPS ट्रान्झॅक्शनद्वारे ५० हजार रुपये व BillDesk या ऑनलाईन पेमेंट गेटवे द्वारा १४ हजार रुपये अशा एकूण ६४ हजार रुपयांची रक्कम दुसऱ्या खात्यात वळविण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर क्राईम मध्ये याबाबत सविस्तर तक्रार दिली त्याचबरोबर केम येथील महाराष्ट्र बँकेमध्ये जाऊन झालेल्या घटनेबाबत माहिती दिली. या घटनेला एक महिना होऊन देखील यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

या प्रकाराबाबत त्यांनी वारंवार बँक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता, “पुन्हा तक्रार करा”, “लवकरच उत्तर येईल” अशी उत्तरे देऊन बँक प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचेही कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सायबर क्राईम विभागाने आत्तापर्यंत काय कारवाई केली आहे हे देखील माहिती देण्यात येत नाही.
“मी दिव्यांग आहे. छोट्या दुकानातून कसाबसा उदरनिर्वाह करतो. ६४ हजार रुपयांची रक्कम माझ्यासाठी खूप मोठी आहे. ही रक्कम गेल्याने माझे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले आहे. मी कुठपर्यंत धाव घ्यायची?” अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रकरणी सायबर विभाग व बँक प्रशासनाने तातडीने कारवाई करून कुलकर्णी यांची गमावलेली रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

या घटनेमध्ये कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना कोणताही कॉल आला नव्हता किंवा त्यांनी कोणालाही ओटीपी शेअर केला नव्हता. त्यामुळे पैसे चोरणाऱ्या व्यक्तीने कुलकर्णी यांचा मोबाईल हॅक केला असल्याची शक्यता वाटत आहे. कुलकर्णी यांच्या मोबाईलवरील ओटीपीचा वापर करत मोबाईल बँकिंगद्वारा पैसे वळवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी whatsapp वर येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये किंवा .apk फाईल डाउनलोड करू नये. तसेच ओटीपी चे एसएमएस आल्यास तात्काळ त्या मेसेज मध्ये असलेल्या बँकेच्या हेल्पलाइनला नंबर वर कॉल केला तर पैसे वाचण्याची शक्यता आहे. याचबरोबर 1930 या सायबर क्राईमच्या नंबर वर देखील तात्काळ तक्रार नोंदवने गरजेचे आहे.

