वनविभागाच्या शासकीय कामात अडथळा – जिंती येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा(संदेश प्रतिनिधी) – वनविभागाच्या लावलेल्या वृक्षांचे नुकसान, वनरक्षकांच्या शासकीय कामात अडथळा, मारहाण आदी कारणामुळे जिंती(ता.करमाळा) येथील पाच जणांविरुद्ध १० ऑक्टोबर रोजी करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे वनरक्षक सुरेश रामचंद्र कुर्ले (वय 32) यांनी या संदर्भात करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिंती ता. करमाळा जि. सोलापूर येथे राखीव वन जमीन गट नं.118/42 ब क्षेत्र 6.1 हेक्टर आर हे गट महसूल विभागाकडून दिनांक 26/02/2022 रोजी वन विभागास हस्तांतर झालेले असून सदर क्षेत्रावर 2022 मध्ये पावसाळ्यामध्ये आम्ही 7,073 खड्डे खोदून व सी.सी.टी. खोदून त्यामध्ये निंब, सिसू, खैर, करंज इत्यादी झाडे लावली होती. त्या क्षेत्रात माहे जुलै व ऑगस्ट 2023 मध्ये दादा हरी शेलार व बापू पंढरीनाथ शेलार, सुखदेव पंढरीनाथ शेलार हे सर्व रा.जिंती ता.करमाळा जि. सोलापूर यांनी अवैध्यरित्या विनापरवाना प्रवेश करून रात्री अपरात्री जेसीबी व ट्रॅक्टरचे सहाय्याने त्या क्षेत्राचे सपाटीकरण, साफसफाई करून लावलेल्या झाडांचे नुकसान केले. या संदर्भात वनगुन्हा नोंदविला होता.
त्या क्षेत्रामध्ये आज (१० ऑक्टोबर) रोजी दुपारी 12/30 वा.चे सुमारास आम्ही व वनरक्षक कामती पोखरापूर सागर जवळगी, वनमजुर करमाळा नारायण पंढरीनाथ चव्हाण व रोजंदारी वनमजुर समवेत त्या क्षेत्रात शासकीय रोपे लागवडी करीता गेलो असता त्या ठिकाणी सोमनाथ दादा शेलार, सुखदेव पंढरीनाथ शेलार, रेखा सुखदेव शेलार, पुजा सोमनाथ शेलार व माऊली शेलार सर्व रा. जिंती ता. करमाळा जि. सोलापूर यांनी येऊन रोप लागवड करण्यास अटकाव व अडथळा करून रोजंदारी वनमजूर गजानन ईश्वर तोरमल रा. कुंभेज ता.करमाळा जि. सोलापूर यांना सोमनाथ दादा शेलार यांनी गालावर चापट मारून दमदाटी करून त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यातून फोटो व व्हिडीओ डिलीट करून मोबाईल परत दिला. असे करून वरील 05 लोकांनी आम्हा कर्मचारी यांना भांडून शासकीय रोपे लागवड करण्यास अडथळा करून शासकीय काम बंद पाडले. तसेच आमचे सोबत वाद घालून बोलताना अपशब्दाचा वापर केला तसेच धमकी देऊन जमाव गोळा करून आमचे शासकीय काम थांबवून दबाव आणला आहे. म्हणून माझी 1 ) सोमनाथ दादा शेलार, 2) सुखदेव पंढरीनाथ शेलार, 3) रेखा सुखदेव शेलार, 4) पुजा सोमनाथ शेलार व 5) माऊली शेलार सर्व रा. जिंती ता. करमाळा जि. सोलापूर यांचे विरूध्द फिर्याद आहे. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.