केम येथे शेतरस्त्याच्या वादातून एकास लाकडी काठीने मारहाण -

केम येथे शेतरस्त्याच्या वादातून एकास लाकडी काठीने मारहाण

0

करमाळा (दि.1): केम गावात रस्त्याच्या वादातून एकाने आपल्या चुलत भावाला लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी अरुण लिंबाजी देवकर (वय ६७, व्यवसाय शेती, रा. केम, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत अरुण देवकर यांनी म्हटले आहे की, माझ्या जमिनीच्या बांधावरून माझा चुलत भाऊ भगवान विठ्ठल देवकर यांनी तहसीलदार करमाळा यांचेकडे रस्ता मागणीसाठी अर्ज केला आहे. सदर रस्ता मागणीच्या अनुषंगाने दिनांक 31/10/2025 रोजी तहसीलदार करमाळा हे स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्या स्थळ पाहणीच्या ठिकाणी मी व वादी पार्टी असे दोघेही उपस्थित होतो.

दि. 31/10/2025 रोजी सायंकाळी अंदाजे 05:00 वाजता मी माझ्या शेतजमिन गट नं. 567 येथे कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळी तेथे माझा चुलत पुतण्या दादा भगवान देवकर, रा. केम, ता. करमाळा हा त्याच्या हातात लाकडी काठी घेऊन आला व मला म्हणाला, “तु रस्ता केसमध्ये आम्हाला विरोध का करतोस?” असे म्हणत शिवीगाळ करू लागला. त्यावेळी मी त्यास सांगितले की, “रस्ता देणे माझ्या हातात नाही. तुम्ही तहसीलदारांकडे रस्ता मागणीसाठी अर्ज केलेला आहे. तहसीलदारांच्या चौकशीनंतर जो काही आदेश होईल, तो पाहता येईल.” असे सांगितल्यावर तो म्हणाला, “तुला जास्त मस्ती आली आहे काय, तुला बघून घेतो,” असे म्हणून त्याने त्याच्या हातातील काठीने माझ्या पाठीवर मारून मला जखमी केले.

त्यावेळी मला मारहाण होऊ लागल्याने मी मोठमोठ्याने ओरडत घरी पळत गेलो. त्यावेळी तो मला घराकडे जाताना पाहून पाठीमागून निघून गेला. त्यानंतर सदर घटनेबाबत मी माझा भाऊ बाळू लिंबाजी देवकर व इतर नातेवाईकांना सांगून केम गावात मोटारसायकलवरून मी व माझा भाऊ बाळू लिंबाजी देवकर जात असताना, केम रोडवरील हत्तीचा म्हसोबा येथे पोहोचलो असता, पाठीमागून दादा भगवान देवकर, त्याची पत्नी मंगला दादा देवकर व मुलगा दिगंबर दादा देवकर हे मोटारसायकलवरून आले व मला थांबवून “तु कुठे चाललास?” असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी आम्हा दोघांवर मारहाण केली. यानंतर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी सोडवाझोडवी केल्यानंतर मी व माझा भाऊ गावात जाऊन खाजगी डॉक्टरांकडे उपचार घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!