बिटरगाव येथे मोटारसायकल अपघातात महिला गंभीर जखमी- तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी

करमाळा, ता.१६ : बिटरगाव (वांगी) येथे सकाळी चालण्याचा व्यायाम करत असताना एका मोटारसायकलने महिलेस धडक देऊन झालेल्या अपघातात महीला गंभीर जखमी झाली आहे.ही घटना ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६-३० वा. घडली आहे.

या प्रकरणी हिराबाई विजय बसळे (वय ५५) ,रा. बिटरगाव (वां.) यांनी दिली. त्यात त्यांनी म्हटले, की मी माझे पती विजय बसळे यांच्यासह दररोजप्रमाणे सकाळी सुमारे ६ वाजता बसळे वस्ती ते कंदर रोड दरम्यान चालण्यास गेले होते.सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास महादेव डोंगरे यांच्या शेताजवळ पोहोचल्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने मला जोरदार धडक दिली. या अपघातात माझ्या डोक्याला, दोन्ही गुडघ्यांना व हातांना दुखापत झाली असून उजव्या गुडघ्याला गंभीर मार लागला आहे.
अपघातानंतर माझे पती विजय बसळे व मुलगा दिगंबर बसळे यांनी मला प्रथम इंदापूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले व नंतर पुढील उपचारासाठी इंदापूर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

दरम्यान, अपघातानंतर संबंधित आरोपी शंभू शिवाजी डोंगरे (रा. बिटरगाव ता. करमाळा जि. सोलापूर) यांच्या वडिलांनी घरी येऊन “पोलीसात तक्रार दिल्यास जीवे मारू” अशी धमकी दिली आहे.
या घटनेबाबत मोटारसायकल स्वार व त्याचे वडीलाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.वाहन कायदा तसेच मारहाण व धमकीप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात येत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


