कोर्टी येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा (दि. २१ जुलै) : कोर्टी येथील खंडोबा झोपडपट्टीत नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण होऊन एका मजुराचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.हा प्रकार, 17 जुलैला झाला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फिर्यादी शितल गणेश भोसले , रा. खंडोबा झोपडपट्टी, कोर्टी) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 17 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता त्या दुध आणण्यासाठी घरातून निघाल्या असताना शेजारी राहणारी सुनिता उर्फ छकुली रतन केंदळे हिने “तुझ्या घरचे नळाचे पाणी आमच्या घरासमोर कसे काय आले?” या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर तिची आई कमल प्रभाकर जगदाणे हिनेही मला हाताने मारहाण केली.

वाद वाढत असताना माझी आई रेणुका, पती गणेश भोसले व नणंद राणी पवार हे भांडण सोडवायला आले. त्या वेळी छकुली हिचा मुलगा गणेश रतन केंदळे याने घरातून लोखंडी पाइप आणून, “तू माझ्या आईला मारायला आला काय?” असे म्हणत गणेश भोसले यांच्या डोक्यात जोरदार मारले.

या आघाताने गणेश जागीच बेशुद्ध पडले आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. काही वेळातच रतन केंदळे (छकुलीचा पती) हा देखील बाहेर येऊन शिवीगाळ करू लागला. नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी मध्यस्थी करत गणेश यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे प्राथमिक उपचारानंतर अधिक गंभीर स्थितीमुळे त्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

18 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उपचार सुरू असताना गणेश भोसले यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.
या घटनेने संपूर्ण कोर्टी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


