कारची आयशियर टेम्पोला धडक – चालक गंभीर जखमी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आयशियर टेम्पोला कारने ड्रायव्हरसाईडने येऊन जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात आयशियर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार ४ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता घडला आहे. याची फिर्याद बिरूदेव अर्जुन भालेराव (रा.चिंचोलीकाटी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी ओमरोड लाईन्स औरंगाबाद यांच्याकडे नोकरीला आहे. आमच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा आयशियर टेम्पो क्र. एमएच २० ईजी ७४०९ हा अमोल जाबवंत जाधव हा चालक टायर घेऊन जेऊर येथे आला व टायर खाली करून तो परत निघाला असता; जेऊर बायपास जवळील लोकप्रिय हॉटेलजवळ चारचाकी पांढऱ्या रंगाच्या वाहनाने येऊन अचानक आयशियर टेम्पोच्या ड्रायव्हर साईडला धडक दिली. त्यात आयशियर टेम्पोचे नुकसान झाले असून, ड्रायव्हरच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात वाहनाविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.