एस.पी.ऑफीसमध्ये तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला – साडे येथील घटना
करमाळा(संदेश प्रतिनिधी) – सोलापूर एस. पी.ऑफीस मध्ये तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. हा प्रकार साडे (ता.करमाळा) येथे मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी घडला आहे. या संदर्भात करमाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र भगवान पुंडे (वय ५३) यांनी साडे(ता.करमाळा) गावातील पिनू उर्फ संगिता फरतडे (गायकवाड), किरण गायकवाड, तेजस गायकवाड यांच्या विरुद्ध करमाळा पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी साडे गावाचा रहिवासी असल्याने पिनू उर्फ संगिता फरतडे (गायकवाड) या महिलेशी माझी ओळख आहे. दिनांक 04/10/2023 रोजी मला माझे फोनवर पिनु उर्फ संगिता फरतडे (गायकवाड) हीचा फोन आला व तीने मला सांगितले की, माझ्यावर उधारी झालेली आहे. मला पैशांची गरज आहे. तुम्ही मला पाच हजार रुपये उसने दया असे म्हणाली असता मी तीला म्हणालो की, माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत, मी तुला पैसे देऊ शकत नाही. असे म्हणालो असता तीने फोन कट केला त्यानंतर ती मला वारंवार फोन करत होती. परंतु मी तीला पैसे देण्यास स्पष्ट नकार देउन तीला म्हणालो की, मी तुला देणे लागत नाही मी तुला पैसे देऊ शकत नाही. सदर महिला मला वारंवार फोन करून पैसे मागत असल्याने व मी तीला पैसे देत नसल्याने ती मला अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळी करत असल्याने मी सोलापूर येथे गेलो व तेथे एसपी ऑफीसला जाउन तिच्या विरुद्ध एक तक्रारीचा अर्ज दिला.
दिनांक 10/10/2023 रोजी सकाळी मी साडे येथील मावळा हॉटेल मधे ९ वा च्या सुमारास चहा पित असताना तेथे पिनू उर्फ संगिता फरतडे (गायकवाड) ही आली व ती मला म्हणाली की, तु मला काठीने मारणार होतास असे मी ऐकले आहे. तू माझ्या विरुद्ध एस. पी. कडे तक्रार करतो काय असे म्हणून मला शिवीगाळ करून लाथा- बुक्क्याने मारहाण करण्यास सुरवात केली. तेवढ्यात तीचे दोन्ही मुले किरण गायकवाड व तेजस गायकवाड हे आले व ते देखील मला हाताने व लाथाने मारहाण करू लागले. तेवढ्यात पिनु ही माझे डाव्या हाताच्या दंडावर जोराने चावली व तेथेच पडलेला दगड घेतला व माझे डाव्या कानाच्या बाजुला मारला व छातीवर उजव्या बाजुस मारुन गंभीर जखमी केले आहे. तेवढ्यात तेजस गायकवाड याने तेथेच असलेली प्लास्टीकची खुर्ची घेतली व माझे पाठीवर, खांदयावर, उजवे गालावर खुर्चीने मारहाण केली तसेच किरण गायकवाड याने तेथे घडलेली विट उचलली व माझे उजवे गालावर व उजवे खांदयावर माराली व त्याने त्याचे हातातील लहान सुरी (चाकु) माझे पोटावर बेंबीच्यावर डावे बाजुस उभी मारल्याने त्यातून रक्त येवू लागले.
तेथे आमच्या गावातील इतर लोक जमा झाले व त्यांनी आमचे भांडण सोडवले, आमचे भांडण सोडवल्यानंतर ते लोक तेथून निघुन गेले व जाताना मला आत्ता वाचलास पुन्हा भेटला तर पुन्हा मारू अशी धमकी देऊन शिवीगाळ करून निवुन गेले. नंतर मी करमाळा येथे येऊन हॉस्पीटलमधे औषध उपचाराकरीता दाखल झालो. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत.