निंभोरे भागात शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात पाहिला बिबट्या - नागरिकांमध्ये प्रचंड घबराट - बंदोबस्त करण्याची मागणी.. - Saptahik Sandesh

निंभोरे भागात शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात पाहिला बिबट्या – नागरिकांमध्ये प्रचंड घबराट – बंदोबस्त करण्याची मागणी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा (ता.11) : निंभोरे (ता.करमाळा) गावच्या दोन किलोमीटर अंतरावर निंभोरे गावातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षपणे बिबट्या पाहिल्याचे सांगितले आहे, निंभोरे-वडशिवणे रोडलगत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर  आज (11 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास शेतकरी योगेश सोडनवर यांच्या शेतात पहाटे कुत्रा भुंकत असल्याने त्यांनी बाहेर आले, त्यांना त्यांच्यासमोर अगदी 30 ते 40 फुटावर बिबट्या उभा होता. ते आत जावून आपल्या पत्नीला घेऊन व बॅटरी घेऊन बाहेर आले. तेव्हा बॅटरी च्या प्रकाशात स्पष्ट दिसला. त्यांनी ही माहिती तातडीने गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळेकर यांना दिली त्यांनी त्वरित वनविभागाचे अधिकारी श्री.कुरले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याभागात वनविभागाचेप्रतिनिधी भेट देतील असे सांगितले आहे. 

यापूर्वी 9 फेब्रुवारी रोजी रात्री 11.15 वाजता सतिश फिटर पांगरे हे निंभोरे वरून वडशिवणेकडे जात असताना सुरुवातीला त्यांना बिबट्या निंभोरे ते वडशिवणे रोडलगत दिसला. त्यानंतर योगेश सोडणवर यांचे दोन कुत्रे त्यापैकी एक कुत्रे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता आहे. काल रात्री 11 वाजता राजुरी येथील श्री.दुरंदे व त्यांचे सहकारी यांना वडशिवणेवरून निंभोरे येथे येत असताना त्यांना रोडवरून जात असताना बिबट्या दिसला आहे. यावरूनच या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षपणे बिबट्या पहिला असल्याने या भागातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

सध्या निंभोरे परिसरात अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याचे सांगितले आहे, आज पहाटे योगेश सोडनवर यांनीही मला बिबट्या संदर्भात माहिती दिली. यावरूनच या परिसरात बिबट्या फिरत असल्याचे जाणवत आहे, त्यामुळे या भागातील बिबट्यापासून धोका होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने यावर तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा असे आम्ही वनविभागाला आवाहन केले आहे. – रवींद्र वळेकर (सामाजिक कार्यकर्ते, निंभोरे) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!