एसटी बसमधून दागिन्यांची चोरी करणाऱ्यास करमाळा पोलिसांकडून अटक
करमाळा (दि.६) – मागच्या महिन्यात २२ नोव्हेंबरला व २४ नोव्हेंबरला करमाळा बसस्थानकाच्या दोन बस मधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने प्रवाशांच्या केलेल्या दागिन्यांच्या चोरीनंतर करमाळा पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले व त्यांनी पोलिसांच्या सर्व यंत्रणांचा वापर करत चोराचा शोध घेतला व त्याला मुद्देमालासहित ३० नोव्हेंबरला अटक करण्यात यश मिळवले आहे.
करमाळा बसस्थानकामधील बस मध्ये चढताना अथवा चढल्यावर तेथील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या पर्स, पाकीट अथवा मौल्यवान वस्तूंच्या होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस सूचना दिल्या होत्या. त्यानुसार करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने कर्जत तालुक्यातील एकाला पाळत ठेवून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी म्हणाले की, दि. २२/११/२४ रोजी दुपारी ०२/३० वाजण्याच्या सुमारास आळजापूर (ता.करमाळा) येथील शितल बिभिषण रोडे या करमाळा येथून जामखेड बसमधून गावी जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन, ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, ९ ग्रॅम वजनाचे फुले-झुबे व ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असे एकूण २,३०,०००/- रु. किंमतीचे दागिने चोरी केले होते. तसेच दि.२४/११/२४ रोजी दुपारी ०२:०० वाजण्याच्या सुमारास छाया बंडेश पांढरे (वय ७५, रा. सोलापूर) या करमाळा ते कुर्डुवाडी बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या उजव्या हातातील १५ ग्रॅम सोन्याची पाटली हातातुन चोरी केली होती. या दोन्ही घटनांबाबत करमाळा पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते.
करमाळा गुन्हे प्रकटीकरण पथक हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचे गुन्हे हे आरोपी सोमनाथ दिलीप काळे (वय २३ वर्षे) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर करमाळा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत सदर आरोपी हा मौजे थेरगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे असल्याची
माहीती मिळाली. या माहीतीच्या आधारे तपास पथकाने थेरगाव येथे दोन दिवस आरोपीचा माग घेत दि.३० नोव्हेंबर ला आरोपीस पकडून अटक केली.
यानंतर आरोपीस करमाळा न्यायालयात उभे केले असता त्याला ६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडे सदर गुन्ह्यांतील चोरी केलेल्या ऐवजाबाबत चौकशी केली असता आरोपीने चोरलेल्या ऐवजापैकी रोडे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन व ९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलस असे एकुण १,४५,०००/- रु. किंमतीचे दागिने तसेच पांढरे यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्हयातील अंदाजे ५०,००० /- रु. किंमतीची १५ ग्रॅम वजनाची एक सोन्याची पाटली असे एकुण १,९५,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने काढुन दिले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक वैभव ठेंगल व पोलिस हवालदार अजित उबाळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, करमाळा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजित उबाळे, पोना वैभव ठेंगल, पोना मनिष पवार, पोका तौफीक काझी पोकॉ ज्ञानेश्वर बांगडे, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ सोमनाथ जगताप तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोना व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.
बसस्थानक परिसर अथवा बसमध्ये महिलांनी मौल्यवान दागिने ही बाहेर काढू नयेत. प्रवाशांनी आपली पर्स, पाकीट, मौल्यवान वस्तू व्यवस्थित संभाळाव्यात. चोरीच्या घटनांवर नियंत्रण रहावे म्हणून करमाळा स्टॅण्डवर कायम पोलिसांचे लक्ष आहे. येथे सीसीटीव्ही वाढवावेत म्हणून आगार प्रमुखांना सूचना केल्या आहेत. गर्दीच्यावेळी रात्री पोलिसांचे सतत पेट्रोलिंग सुरू असून चोरीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जात आहे.
● विनोद घुगे, पोलिस निरीक्षक, करमाळा