सुगंधी तंबाखू व गुटखा वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली- लाखोंचा माल जप्त -

सुगंधी तंबाखू व गुटखा वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पकडली- लाखोंचा माल जप्त

0

करमाळा(दि.२): दि. २८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेने पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत सुमारे ३ लाख २१ हजार ७५० रुपयांचा सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त केला. तसेच वाहनासह एक आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २८ जुलैच्या मध्यरात्री महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची मराझो कार (MH 20 FU 7246) संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजित माने यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्यांच्या टीमला सूचना दिल्या. या वाहनाचा रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास करमाळा ते जातेगाव रस्त्यावर पाठलाग करून ताबा घेण्यात आला.

वाहन चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये हिरव्या व तपकिरी रंगाच्या गोण्यांमध्ये हिरा कंपनीचा सुगंधी तंबाखू व गुटख्याची पाकिटे सापडली. त्यातील मुद्देमाल खालीलप्रमाणे आहे:

  • हिरा पानमसाला – १६५० पाकिटे × ₹१३० = ₹२,१४,५००
  • रॉवल ७१४ तंबाखू – १६५० पाकिटे × ₹६५ = ₹१,०७,२५०
  • वाहन किंमत – ₹८,००,०००
  • एकूण जप्त मुद्देमाल किंमत – ₹११,२१,७५०

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र विनायक बाविसकर (वय ४०, रा. देवडाई, जि. संभाजीनगर) असे असून, त्याच्या चौकशीतून गुटखा वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांना देण्यात आली असता, श्रीमती रेणुका रमेश पाटील (वय ३८) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात येऊन कारवाईत सहभाग घेतला. या कारवाईत पोना/११६२ मनिष पवार हे तपास करीत आहेत.

ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने आणि त्यांची टीम – पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोकॉ गणेश खोटे, अर्जुन गोसावी, स्वप्नील शेरखाने, रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, मिलिंद दहिहांडे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ व्यंकटेश मोरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!