केम येथील सहा जणांना गाडी अडवून बारा जणांकडून करमाळा येथे मारहाण
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : केम येथील सहा जण गाडीतुन करमाळा येथून जात असताना पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून केम मधीलच इतर दहा ते बारा जणांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली आहे. हा प्रकार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास करमाळा येथील मौलाली माळ येथे घडला. या प्रकरणात केम येथील सुलतान रमजान मुलाणी, वय ३० यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यात आरोपींनी फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांना काठी, लोंखडी गज, वायर, दगडाने मारून तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सविस्तर माहिती देताना सुलतान रमजान मुलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २६ फेब्रुवारीला अहमदनगर येथे लग्न होते. त्यासाठी दुपारी पावणे तीन वाजता केम येथून मी व माझे मित्र अल्लारखा हुसेन पठाण, अफताब बादशाह मुलाणी, सद्दाम राजू मुलाणी, खलील मुलाणी, रब्बीसलाम हजरत मुलाणी असे आम्ही ६ जण माझ्या इंडिका विस्टा या गाडीत बसून निघालो.
करमाळा येथे पावणे चार च्या सुमारास मौलाली माळ येथे पोहोचलो असता. पाठीमागुन एक पांढऱ्या रंगाची स्कॉरपीओ गाडी आली व त्या गाडीच्या चालकाने त्यांची गाडी आमचे गाडी सामोर रस्त्यावर आडवी लावली.
त्यावेळी माझे गाडी अल्लारखा पठाण हा चालवित होता त्याने गाडी थांबविली असता समोरील स्कॉपीओ मधून अभिजीत तळेकर, सोनू कुरडे, रमेश मखरे, बबलू धोत्रे, निखील तळेकर सर्व रा. केम ता. करमाळा जि. सोलापूर हे गाडीतून उतरुन तसेच त्यांच्या सोबतचे 5 ते 7 अनोळखी इसमांनी गाडी जवळ येवून त्यांच्या हातातील लाकडी काठीने, लोंखडी गजाने, दगडाने, केबलने गाडीच्या पुढील व मागील बाजूच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले.
त्यानंतर गाडी चालवित असलेला अल्लारखा पठाण यांस अभिजीत तळेकर याने गाडीतून बाहेर ओढून त्यास
लोखंडी चैनने मारहाण केली असून त्यामध्ये त्यास पाठीवर, खांद्यावर, मनगटावर डोळयावर, मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच आफताब मुलाणी यास बबलू धोत्रे याने त्याचे हातातील काठीने गुडघ्यावर, डावे हाताचे कोप-यावर, तसेच डावे पायावर मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच रब्बीसलाम मुलाणी यास सोनू कुरडे याने उजवे पायाचे पोटरीवर केबलने मारहाण करुन जखमी केले.
खलील मुलाणी यास निखील तळेकर याने त्याचे हातातील दगडाने मांडीवर तसेच डोक्यास मारहाण केली आहे. तसेच आफताब मुलाणी यांचे गळयातील दोन तोळे वजनाची चैन व पाकीट भांडणामध्ये कोणीतरी जबरीने हिसकावुन नेली आहे. पूर्वीच्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन या सर्वांनी आम्हाला काठी, लोंखडी गज, वायर, दगडाने मारून तसेच शिवीगाळी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
यामध्ये भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमाअंतर्गत १४३,१४७,१४८,१४९, ३२७,३४१,४२७,३२४,५०४, ५०६ आदी कलम लावून अभिजीत तळेकर, सोनू कुरडे, रमेश मखरे, बबलू धोत्रे, निखील तळेकर सर्व रा. केम ता. करमाळा जि. सोलापूर तसेच इतर ७ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करत आहेत.