देवीच्या मंदिरातील दागिन्याची चोरी उघडकीस, आरोपी अटकेत

करमाळा(दि.२६):श्रीदेवीचामाळ येथील कमलाभवानी देवी मंदिरातील उत्सव मूर्तीच्या दागिन्यांची चोरी उघडकीस आली असून करमाळा पोलिसांनी या प्रकरणी संशयिताला अटक करून त्याच्याकडून २४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सागर बाळू राऊत (३१, रा. कुंकुगल्ली, करमाळा, जि. सोलापूर) असे आहे.

ही चोरी २२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० या वेळेत झाली होती. मंदिराचे पुजारी रोहीत महादेव पुजारी (२२, रा. देवीचा माळ, करमाळा) यांनी या बाबत फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, उत्सव मूर्तीच्या गळ्यातील अंदाजे २.४ ग्रॅम वजनाचे दोन वाट्या व चार मणी असलेले मणीमंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथक नेमले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सागर राऊत यानेच ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व सोन्याचे दागिने काढून दिले.

ही कामगिरी हवालदार अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, मिलींद दहीहांडे, अर्जुन गोसावी, योगेश येवले, राहुल भराटे, अमोल रंदिल, गणेश खोटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे व्यंकटेश मोरे यांनी केली आहे. पुढील तपास हवालदार ए. एस. मोहोळकर हे करत आहेत.


