केम-कंदर रोडवर गांज्याच्या साठ्यासह तिघे अटक

करमाळा, दि. २ सप्टेंबर : गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजे कंदर परिसरात सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १३ किलो ४५० ग्रॅम गांजा तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे ८ लाख ११ हजार रुपये आहे.

दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केम-कंदर रोडवर कारवाई केली. दुपारी साडेचारच्या सुमारास बिगर नंबरची स्विफ्ट कार व अॅक्टीव्हा स्कुटर थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान सहा पाकिटांत गांजा आढळून आला.

अटक करण्यात आलेल्यांची नावे सचिन नागनाथ निवाळ (२६), आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी (२६) आणि सचिन सुरेश बावळे (४०, तिघे रा. वेणेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) अशी आहेत.

या प्रकरणी पोलिस नाईक मनीष पवार यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ७२५/२०२५ अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



