मोटरसायकलची समोरासमोर धडक-दोघे जखमी
करमाळा (दि.७) – करमाळा तालुक्यातील साडे ते घोटी या रस्त्यावर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटार सायकल स्वार जखमी झालेले आहेत. याबाबत साडे येथील किशोर देवडे यांनी करमाळा पोलीस स्टेशनमध्ये दुसऱ्या मोटारसायकलस्वारा विरोधात फिर्याद दिलेली आहे.
दिलेल्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता माझे वडील लक्ष्मण देवडे हे आपल्या एम एच 45 एक्स 9740 यावर चालले होते.ते साडे ते घोटी रोडवर लोंढे वस्तीजवळ गेले असता पांडुरंग महादेव जबडे रा.इंदापुर जि.पुणे हा इसम त्याची मो.सा.नं . एम एच 42 ए जे 9419 यावर घोटीकडून साडे गावाकडे भरधाव वेगात येउन माझे वडिल लक्ष्मण हे चालले होते त्या बाजुला येउन त्यांना जोराची धडक दिली. त्यात माझ्या वडिलांना तोंडाला व डोक्यास गंभीर मार लागला, तोंडातून रक्तस्राव होऊ लागला. तसेच धडक देणारा इसम देखील जखमी झाला. तसेच दोन्ही मोटारसायलचे नुकसान झाले आहे. वडिलांच्या डोक्यातुन जास्त रक्तस्त्राव होउ लागल्यामुळे मी व गावातील लोकांनी खाजगी चारचाकी गाडीत वडिल लक्ष्मण व वडिलांच्या मोटारसायकलला धडक देणारा अनोळखी इसमास आम्ही करमाळा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी घेउन आलो. तसेच प्रथमोपचार झाल्यानंतर वडिलांना पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
या अपघातास तो इसम जबाबदार असून त्याच्या विरोधात मी तक्रार देत आहे असे देवडे यांनी फिर्यादीत नोंदवले आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करत आहेत.